जळगाव: जळगाव जिल्हयात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि दिवसेंदिवस वाढत असलेली कोविड पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या एक चिंतेचा विषय झाला आहे. त्यासाठी प्रशासकीय पातळीवर योग्य त्या उपाययोजना राबवल्या जात आहेत.
महाराष्ट्र शासन, महसुल व वन विभाग, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, मंत्रालय मुंबई यांच्याकडील आदेश व जिल्हाधिकारी जळगाव यांच्याकडील आदेशानुसार लॉकडाऊन काळात केवळ पन्नास लोकांच्या मर्यादेत सोशल डिस्टंससह विविध अटीवर लग्न समारंभ साजरा करण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी विहीत नमुन्यात अर्ज करावा लागणार आहे.
लग्न समारंभ कोणकोणत्या ठिकाणी पार पाडता येतील याबाबतचा उल्लेख या आदेशात नाही. तसेच सध्या पावसाळा सुरु असल्यामुळे खुले लॉन्स, विना वातानुकुलीत मंगल कार्यालय, हॉल, सभागृह तसेच घर वा घराच्या परिसरात केवळ पन्नास जणांच्या मर्यादेत लग्न समारंभ पार पाडण्यास नागरिकांकडून मागणी झाल्यास तशी परवानगी देण्यात यावी असे आदेशात नमुद करण्यात आले आहे.
यासाठी आयुक्त जळगाव महानगरपालिका यांनी महानगरपालिका क्षेत्रात व महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात कार्यकारी दंडाधिकारी यांची परवानगी विहीत नमुन्यातील अर्ज भरुन घ्यायची आहे.