जळगाव : प्रेम हे आंधळे असते असे म्हणतात. मात्र विशीच्या घरातील अर्थात टीन एजर प्रेम हे बहुतेक वेळा केवळ शारीरीक प्रेम असते. बाह्य आकाराला भुलून विशीच्या घरातील प्रेमीयुगल घर सोडून पळून जातात. मात्र त्यांच्या पळून जाण्यामुळे घरातील कर्ते लोक किती हैरान होतात याची त्यांना कल्पना नसते. शारीरीक आकर्षण संपल्यावर हे प्रेमी युगल पुन्हा आपल्या मार्गाने वाटचाल करतात हा आजवरचा अनुभव कित्येक घटनांमधून आपल्याला दिसून येतो.
अशाच एक घटनेत नागपूरची स्विटी (नाव बदललेले) तिच्या नागपुरच्या स्थानीक प्रियकरासोबत जळगाव जिल्ह्यात पळून आली होती. दोघे प्रियकर जळगाव जिल्ह्यात आल्यावर वेळोवेळी घर बदलवू लागले. कधी यावल तालुक्यात तर कधी जळगाव शहरात ते रहात होते. त्यांच्या वयाकडे तसेच वारंवार घरबदलू वृत्ती बघून परिसरातील लोकांना त्यांची शंका येवू लागली. त्यांचे वय विशीच्या जवळपास जेमतेम टेकले होते. त्यांची चंचल वृत्ती बघून कुणीतरी एकाने स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांना या बाबत माहिती दिली.
पो.नि.किरणकुमार बकाले यांनी खात्री करण्याकामी त्यांचे सहकारी शरद भालेराव आणि नरेंद्र वारुळे यांना पाठवले. मिळालेली माहिती खरोखर दमदार होती. त्यांना माहिती विचारली असता ते नागपूरचे असल्याचे त्यांनी दोघा पोलिस कर्मचा-यांना सांगीतले. दोघांची व-हाडी बोलीभाषा लगेच लक्षात येत होती.
त्यांना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. किरणकुमार बकाले यांच्या समक्ष हजर करण्यात आले. पो.नि. किरणकुमार बकाले यांनी लागलीच नागपुर पोलिसांसोबत संपर्क साधून मिसींग दाखल आहे काय? याची पडताळणी केली. चौकशीअंती हुडकेश्वर पोलीस स्टेशनला विस वर्षाची मुलगी हरवल्याची नोंद आढळूण आली. तसेच तिची माहिती देणा-यास पाच हजार रुपयांचे बक्षीस देखील जाहीर करण्यात आले होते.
ती मुलगी जळगावात तिच्या प्रियकरासमवेत असल्याची माहीती नागपुर पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच नागपुर पोलिसांच्या पथकाने मुलीच्या मामाला सोबत घेत जळगाव गाठले. आपल्या मामाला बघताच मुलीने त्यांना मिठी मारली. गेल्या दिड वर्षापासून मामा व भाचीची भेट झालेली नव्हती. मुलीचे वडील वारले असल्यामुळे तिचे मामाच तिला दुहेरी प्रेम लावत होते.
अशा प्रकारे कायदेशीर प्रक्रियेनंतर नागपुर पोलिस दोघा प्रेमीयुगुलास घेवून नागपूरच्या दिशेने रवाना झाले. याकामी एलसीबीचे पो.नि. किरणकुमार बकाले व त्यांचे सहकारी वारुळे व शरद भालेराव यांचे परिश्रम उपयोगी पडले.