जळगाव : काही महिन्यापुर्वी अमळनेर पोलिसांनी अशोक कंजर या इसमाकडून 100 किलो गांजा पकडून अंमली पदार्थ कायद्यानुसार गुन्हा दाखल केला होता. या घटने नंतर आता गांजाचे अमळनेर – पारोळा – कल्याण कनेक्शन समोर आले आहे. कल्याण पोलिसांनी गांजाचा पुरवठा केल्याप्रकरणी पारोळा येथील एक पुरुष व एक महिला अशा दोघांना ताब्यात घेतले आहे.
कल्याण पश्चिम भागातील महात्मा फुले चौक पोलीस स्टेशन हद्दीत पावणे दोन किलो गांजाची विक्री केल्याप्रकरणी पोलिसांनी पारोळा तालुक्यातील मुंदाणे येथील रोशन पांडुरंग पाटील या इसमास 7 डिसेंबर रोजी ताब्यात घेतले होते. त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने पारोळा येथील सानेगुरुजी कॉलनीतील रहिवासी असलेल्या उषाबाई रमेश पाटील या महिलेकडून गांजा घेतल्याचे कबुल केले होते. उषाबाई पाटील या महिलेने हा गांजा अमळनेर येथील अशोक कंजर याच्याकडून घेतला होता असे कबुल केले आहे. अशा प्रकारे गांजाहे अमळनेर – पारोळा – कल्याण संयोजन उघड झाले आहे.
अशोक कंजर याने आपला गांजा विक्रीचा व्यवसाय सुरु केला असल्याचे कल्याण पोलीसांच्या कारवाईतून पुन्हा एकदा समोर आले आहे. कल्याण पोलिसांनी अमळनेर येथून अशोक कंजर याला देखील ताब्यात घेतले आहे.
कल्याण येथील स.पो.नि. दीपक सरोदे व त्यांचे सहकारी कर्मचारी चौकशीकामी अमळनेर येथे आले असता अशोक कंजर याचे नाव पुढे आले. याच अशोक कंजर याच्या कब्जातून अमळनेर पोलिसांनी जवळपास 100 किलो गांजा पकडला होता. त्याच्यावर अमली पदार्थ कायद्यानुसार रितसर गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता.