औरंगाबाद : गेल्या चौदा महिन्यापासून बेपत्ता असलेल्या तरुणाचा पुरलेला मृतदेह गंगापुर पोलिसांनी शनीवारी जेसीबीच्या मदतीने उकरुन बाहेर काढला. प्रेमी युगलाचे अनैतीक संबंध मयतास माहित होते. माहिती असलेले अनैतीक संबंध उघड करण्याची धमकी तो आरोपीस देत होता. त्यामुळे दोघांनी मिळून त्याचा खून केल्याचे तपासात उघड झाले. या घटनेप्रकरणी गंगापूर पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेत अटक केली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याच्या अमळनेर येथील तरुण गणेश दामोदर मिसाळ 5 ऑक्टोबर पासुन बेपत्ता असल्यामुळे त्याचे नातेवाईक हवालदिल झाले होते. 10 ऑक्टोबर 2019 रोजी त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार गंगापुर पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली होती.
सखोल तपासाअंती गंगापुर पोलिसांनी सचिन ज्ञानेश्वर पंडित व रवींद्र उर्फ पप्पू कारभारी बुट्टे (दोघेही रा.अंमळनेर, ता.गंगापूर जिल्हा औरंगाबाद) यांना संशयाच्या बळावर ताब्यात घेतले. त्यांची कसून चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली.
सचिन ज्ञानेश्वर पंडित याचे परिसरातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध सुरु होते. दोघांचे संबंध मयत गणेश मिसाळ यास समजले होते. त्यामुळे हे संबंध गावात उघड करण्याची धमकी तो सचिन यास देत होता. या कारणातून सचिन याने रविंद्र उर्फ पप्पू बुट्टे याच्या मदतीने कट रचून सुरुवातीला त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा दोरीने गळा आवळून खून केला. खुन केल्यानंतरे गणेशचा मृतदेह अमळनेर शिवारातील पांडुरंग गाडे यांच्या शेतात पुरला होता.
या घटनेप्रकरणी दोघा संशयीत आरोपींविरुद्ध गंगापूर पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या खूनाचा छडा योग्य रितीने लावल्याबद्दल पोलिस अधिक्षक मोक्षदा पाटील यांनी तपास पथकाला 15 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर केले.