जळगाव : कत्तलीसाठी गोठ्यातील पशूधन (एक गाय व दोन वासरे) चोरुन नेल्याप्रकरणी एमआयडीसी पोलिस पथकाने एकाला अटक केली आहे. या प्रकरणी आरोपीसह एक वासरी व गुन्ह्यात वापरण्यात आलेली स्विफ्ट कार जप्त करण्यात आली आहे. शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (52) कुंभार वाडा पाळधी असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की जळगाव – मेहरुण परिसरातील इकबाल पिरजादे यांच्या ताब्यातील गोठ्यात बांधलेली एक गाय व दोन वासरी ऑगस्ट व सप्टेबर महिन्यात चोरीला गेल्या होत्या. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याचा तपास सुरु असतांना मिळालेल्या माहितीनुसार पाळधी येथील शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (52) रा. कुंभार वाडा, पाळधी बु. ता. धरणगाव यास ताब्यात घेत त्याची सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीतून सदर गुन्हा केल्याचे त्याने कबुल केले. त्याला अटक करण्यात आली आहे. त्याने दिलेल्या माहितीनुसार त्याच्या अजुन दोघा साथीदारांची नावे निष्पन्न झाली आहेत. वसीम अहमद मोहम्मद असलम कुरेशी रा. मालेगाव व शेख मुजाहीद शेख जाबीर कुरेशी रा. मासुमवाडी जळगाव अशी त्यांची नावे असून त्यांचा शोध सुरु आहे.
यातील वसीम अहमद असलम व शेख मुजाहीद शेख जाबीर यांनी ते पशुधन त्यांच्या मारुती स्विफ्ट (एमएच 01 बीटी 4255) या कारमधे चोरुन कत्तलीसाठी नेले होते. ती गाय व वासरे शेख अजगर शेख गुलाम यास विक्री करण्यात आले. या प्रकरणी इकबाल पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार शेख अजगर शेख गुलाम कुरेशी (52) कुंभार वाडा पाळधी, वसीम अहमद मोहम्म असलम कुरेशी रा. मालेगाव व शेख मुजाहीद शेख जाबीर कुरेशी यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा एमआयडीसी पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न.1080/20 भा.द.वि. 379 महाराष्ट्र प्राणी सरंक्षण अधिनियम 1976 चे सन 2015 चे महाराष्ट्र अधिनियम कलम 5 व 5(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. अटकेतील शेख अस्गर शेख गुलाम याच्याविरुद्ध यापुर्वी एमआयडीसी, धरणगाव, भुसावळ, रामानंद नगर व चोपडा या पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.
एमआयडीसी पोलिस स्टेशनचे पोलिस उप निरिक्षक रामकृष्ण पाटील, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, इम्रान सैय्यद, सचिन पाटील यांच्या पथकाने आरोपी शेख अजगर यास अटक केली.