भावजयीने चारचौघात निलेशला खडे बोल सुनावले! संतापाच्या भरात त्याने आयुषला विहीरीत ढकलले!!

जळगाव : आयुष हा अवघा तिन वर्ष वयाचा बालक होता. आई वडीलांचा तो लाडका मुलगा होता. घरातील सर्व जण त्याचे खुप कोडकौतुक करत असत. मागास समाजात जन्मलेल्या आयुषचे आईवडील अशिक्षीत व मोलमजुरी करणारे होते. त्यांना साधे रुपये – पैसे देखील व्यवस्थित मोजता येत नव्हते.

जळगाव जिल्ह्याच्या भडगाव तालुक्यातील वडगाव (सतीचे) या लहानशा गावात आयुष आपल्या आईवडीलांसह रहात होता. आयुषचे वडील दिपक रामदास गायकवाड यांच्यासह त्यांचे एकुण आठ भाऊ आहेत. दिपक गायकवाड यांच्यासह त्यांच्या सात भावांचे घर जवळ जवळ आहेत. मात्र निलेश हा इतरांपेक्षा थोडा लांब रहात होता.  

दुर्दैवी आयुष – नराधम काका निलेश

निरागस बालक असलेल्या आयुषची आई व त्याचा काका निलेश या दिर – भावजयमधे बचत गटाच्या पैशावरुन काहीतरी आर्थिक व्यवहार होता. या व्यवहारात आयुषच्या आईला दिर निलेशकडून पैसे घेणे होते. निलेश ते पैसे देण्यास टाळाटाळ करत होता. त्यामुळे आयुषची आई त्या पैशांसाठी तगादा लावत होती.

एके दिवशी आयुषच्या आईने दिर निलेश यास भर रस्त्यावर चार चौघात ते पैसे मागीतले. केवळ मागीतलेच नाही तर चार चौघात त्याला शिवीगाळ करत त्याची इज्जतीची ऐशीतैशी केली. आपल्या भावजयीने भर रस्त्यावर आपल्या इज्जतीचा पंचनामा केल्यामुळे निलेशच्या मनात तिच्याविषयी राग निर्माण झाला होता. आयुषच्या आईला कायमची चांगलीच अद्दल घडवायची हे दिर निलेशने मनाशी ठरवले होते. त्याच्या मनात संतापाची लाट उसळली होती.

14 डिसेंबरच्या दुपारी निरागस बालक आयुष हा त्याचा काका निलेशसोबत होता. यावेळी निलेशच्या मनात त्याच्या भावजयीचा राग घोळत होता. निलेशच्या मनातील भावजयीचा राग आणि सोबतीला पुतण्या आयुष असा दुर्दैवी संयोग जुळून आला. बोलत बोलत निलेशने आयुष यास विहीरीजवळ आणले. विहीरीच्या काठावर आयुष भोळ्या मनाने उभा होता. आपला काका असलेल्या निलेशच्या मनात काय विचारचक्र सुरु आहे याची कल्पना निरागस बालक आयुषला नव्हती.

अशोक उतेकर पोलिस निरिक्षक

आयुष विहीरीच्या काठावर उभा असतांना त्याच्या आईविषयी निलेशच्या मनातील राग उफाळून आला. त्याने संतापाच्या भरात निष्पाप बालक आयुषच्या पार्श्वभागावर जोरदार लाथ हाणली. काकाची लाथ बसल्यामुळे पुतण्या आयुष विहीरीत पडला. विहीरीला  त्याच्या मानाने भरपूर पाणी होते. चिमुकल्या आयुष यास विहीरीच्या पाण्यात पोहता येत नव्हते. त्यामुळे तो बुडू लागला. विहीरीत पडलेला आयुष मनातून खुप घाबरला. आयुषने आपला जीव वाचवण्यासाठी खुप आरडाओरड आणि प्रयत्न केला. मात्र त्याचा आवाज ऐकण्यासाठी कठोर काळजाच्या निलेश व्यतिरीक्त तेथे दुसरा कुणीही नव्हता. अखेर पाण्यात बुडून आयुषने आपला अमुल्य जिव सोडला. त्याच्या आयुष्याची दोरी बळकट नसल्यामुळे ती तेथेच संपली.

दरम्यान सायंकाळ झाली तरी आयुष घरी परत आला नाही म्हणून त्याचे आईवडील  बेचैन झाले. त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. आपला मुलगा कुठे गेला असेल व काय करत असेल, त्याने काही खाल्ले असेल किंवा नाही, त्याला भुक तर लागली नसेल असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या आईवडीलांच्या मनात निर्माण झाले होते.

आपल्या मुलाला कुणीतरी पळवून नेल्याप्रकरणी आयुषच्या वडिलांनी भडगाव पोलिस स्टेशनला 14 डिसेंबर रोजी धाव घेत फिर्याद दाखल केली. त्यांच्या फिर्यादीनुसार भडगाव पोलिस स्टेशनला गु.र.न. 320/20 भा.द.वि.363 नुसार अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. अशोक उतेकर व त्यांच्या सहका-यांनी सुरु केला. बेपत्ता आयुष यास शेवटचे कुणी कुणी पाहीले याबद्दल प्राथमिक तपास सुरु करण्यात आला. या तपासातून त्याचा काका निलेश याचे नाव पुढे आले. त्यामुळे संशयाची सुई निलेश गायकवाड याच्याकडे जावू लागली. त्याच्या हालचालीवर पोलिस पथकाने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच्या हालचाली संशयास्पद वाटत होत्या. बेपत्ता आयुषच्या आईने निलेश यास भर रस्त्यावर चार चौघात पैशांच्या कारणावरुन शिवीगाळ करत त्याच्या इज्जातीचा पंचानामा केल्याचे लोकांच्या चर्चेतून पोलिस पथकाला समजले होते.

अखेर पो.नि. अशोक उतेकर यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकातील कर्मचा-यांनी निलेश यास चौकशीकामी ताब्यात घेतले. त्याला पो.नि. अशोक उतेकर यांच्यासमक्ष हजर करण्यात आले.  पो.नि. अशोक उतेकर यांनी सुरुवातीला त्याची प्रेमाने विचारपुस केली. मात्र निलेशच्या बोलण्यात संशय दिसून येत होता. आयुष यास आपण पाहिले नाही असे तो सुरुवातीला सांगत होता. नंतर तो पाय घसरुन विहीरीत पडला असे सांगू लागला. त्याच्या बोलण्यात तफावत पडत होती. तो उडवा उडवीची उत्तरे देत असल्याची बाब पो.नि. अशोक उतेकर यांच्या पारखी नजरेतून सुटली नाही. अखेर त्यांनी त्याला पोलिसी खाक्या दाखवला. पोलिसी खाक्या दिसताच त्याने आपला गुन्हा कबुल केला.

आयुषच्या आईने भर रस्त्यात पैशाच्या वादातून आपल्याला अतिशय खालच्या स्तरावरील शिवीगाळ केली होती. त्यामुळे त्याच्या आईबद्दल आपल्या मनात राग निर्माण झाला  होता अशी कबुली निलेशने दिली. त्या रागातून आपण आयुषच्या पार्श्वभागावर लाथ मारुन त्याला विहीरीत ढकलून दिल्याची कबुली दिली. त्याने कबुली दिल्यानंतर रात्रीच्या अंधारात अथक प्रयत्नाने आयुषचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. तो मृतदेह जळगाव सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीकामी नेण्यात आला.

अशा प्रकारे अगोदर अपहरण व नंतर विहीरीत ढकलून देत हत्या केल्याचा घटनाक्रम उघडकीस आला. अवघ्या चोवीस तासात बालकाच्या मृत्यूचे गुढ उलगडण्यात पो.नि. अशोक उतेकर व त्यांच्या पथकाला यश आले. नराधम काका निलेश गायकवाड यास अटक करण्यात आली. वैद्यकीय अहवाल तसेच पोलिसांच्या ताब्यातील निलेश गायकवाड याने दिलेल्या कबुली जबावानुसार या गुन्ह्यात भा.द.वि. 302 व 364 असे वाढीव कलम लावण्यात आले.

या गुन्ह्याच्या तपासकामी पो.नि. अशोक उतेकर व त्यांचे सहकारी हे.कॉ. कैलास गिते, पो.ना.लक्ष्मण पाटील, पो.ना. नितीन राऊत, पो.कॉ. स्वप्नील चव्हाण, इश्वर पाटील, दत्तात्रय पाटील यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here