जळगाव : शनी पेठ पोलिस स्टेशन हद्दीत असलेल्या चौघुले प्लॉट परिसरात पूर्व वैमनस्यातून रविवारी सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास दोन गटात तुफान हाणामारी झाली.
या घटनेत लाकडी काठ्यांसह लोखंडी पाईपाचा वापर झाला.
या हाणामारीच्या घटनेत एक गटातील दोघे जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. सायंकाळी दोन्ही गटांनी दिलेल्या तक्रारीनुसार परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. त्यात एका गटाविच्या विरोधात दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पहिल्या गटातील दीपक दत्तु चौधरी याने दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक व त्याचा लहान भाऊ मनोज उर्फ काल्या चौधरी (चौघुले प्लॉट) हे दोघे जण सकाळी शनिपेठ पोलीस स्टेशनला हजेरी लावण्यासाठी जात होते. साडे अकरा वाजेच्या सुमारास चौघुले प्लॉट भागातील हनुमान मंदिराजवळून जात असताना या दोघा जणांना हितेश संतोष शिंदे, संतोष रमेश शिंदे, आकाश संजय मराठे, संजय मराठे, माया उर्फ विक्की, पिंटू मराठे (सर्व रा. चौघुले प्लॉट) यांनी घेराव घालून वाद घातला. तुमचा जामीन कसा काय झाला? असा जाब विचारत हितेश शिंदे याने त्याच्या हातातील लाकडी काठीने मारहाण सुरु केली. त्यानंतर पिंटू याने देखील मारहाण केल्यावर आकाश मराठे याने लोखंडी पाईप दीपकच्या डोक्यात मारला. त्यात तो गंभीररित्या जखमी झाला. त्यातच मनोज हा वाद सोडविण्यास गेला असता त्याला देखील इतर सर्वांनी लाथा-बुक्क्यांसह लाकडी काठीने मारहाण करण्यात आली. त्यात त्याच्या हाताला गंभीर दुखापत झाली. दोन्ही भाऊ गंभीर जखमी झाल्यानंतर सर्व जण तेथून पळून गेले. दोन्ही भावांना त्यांच्या घरातील सदस्यांनी सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. सायंकाळी दीपक याने दिलेल्या फिर्यादीनुसार मारहाण करणा-यांविरूध्द मारहाण व दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दुस-या गटातील हितेश संतोश शिंदे (रा. चौघुले प्लॉट) याने दिलेल्या फिर्यादीनुसार रविवारी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास हितेश हा चौघुले प्लॉट परिसरातील प्रसाद किराणा दुकानाजवळ उभा होता. त्यावेळी मनोज चौधरी व त्याचा मित्र नानु बोबड्या असे त्याच्याजवळ आले. तु आमचा पहिला जामीन रिजेक्ट केला आहे. तुला जास्त झाली आहे का?, काल तु वाचला असे म्हणत मनोजने हितेशला शिवीगाळ सुरु केली. त्यानंतर त्याने कानशिलात लगावली. काही वेळाने दीपक चौधरी, दत्तु चौधरी, राज चौधरी यांनी लाथा-बुक्क्यांनी तसेच लाकडी काठीने मारहाण सुरु केली. सायंकाळी हितेश याने दिलेल्या फिर्यादीनुसार मनोज चौधरी, दत्तु चौधरी, राज चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
पहिल्या गटातील दोन्ही भावांचा शनिवारी जामीन झालेला होता. रविवारी पुन्हा पूर्ववैमनस्यातून त्यांचे वाद झाले. पाच जणांना शनिपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दुस-या गटातील हितेश शिंदे, संतोष शिंदे, आकाश मराठे, संजय मराठे व पहिल्या गटातील दत्तु चौधरी यांचा त्यात समावेश आहे.