नाशिक : दारुचे व्यसन असलेल्या आपल्याच मुलाचा वडीलांनी इतर दोघा मुलांच्या मदतीने खून केला असल्याची माहिती पोलिसांना एका पत्राच्या माध्यमातून समजली. त्यानंतर तपासाची चक्रे वेगाने फिरताच तरुणाच्या खूनाचा उलगडा झाला. नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका पोलिस स्टेशन हद्दीत घडलेल्या व उघडकीस आलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
अमोल सोमनाथ वर्हे (19) रा. नगरसुल-नांदगाव रोड, नगरसुल, ता. येवला हा तरुण गेल्या तिन ते चार महिन्यांपासून घरातून गायब झाला होता. त्याचा कुठेही मागमुस लागत नव्हता. गायब झालेल्या अमोल वर्हे या तरुणाचा त्याच्याच वडील व दोघा भावांसह नातेवाईकांनी खुन केला असून त्याचा मृतदेह लोहशिंगवे जंगलात पुरुन टाकले असल्याचे एक पत्र पोलिसांना गेल्याच आठवड्यात प्राप्त झाले.
या गंभीर पत्राची दखल नाशिक ग्रामीण पोलिस अधिक्षक सचिन पाटील यांनी तत्परतेने घेतली. या प्रकरणी अप्पर पोलिस अधिक्षक (मालेगाव) चंद्रकांत खांडवी, उप विभागीय पोलिस अधिक्षक (मनमाड विभाग) समिरसिंह साळवे यांनी पोलिस अधिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली येवला पोलीस स्टेशनला शहानिशा करण्याचे आदेश दिले होते.
त्यानुसार येवला तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक अनिल भवारी यांचे मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरिक्षक एकनाथ भिसे, सपोनि राजपूत, सहायक फौजदार सुरासे, हवालदार अल्ताफ शेख, पोना राजेंद्र केदारे, पो.कॉ. सतिश मोरे, आबा पिसाळ, दिपक सांगळे यांनी नातेवाईक व मित्रांकडे कसून चौकशी सुरु केली. या तपासात व चौकशीत अमोल सोमनाथ वर्हे हा तरुण गेल्या चार महिन्यापासून गायब असल्याचे आढळून आले. गेल्या तिन ते चार महिन्याच्या कालावधीत तो कुणालाही दिसून आलेला नव्हता. त्याचा नक्कीच घातपात झाल्याची गोपनीय माहिती पोलिस पथकाला समजली होती.अमोल वर्हे या तरुणाच्या मित्रांकडे सखोल चौकशी केली असता त्याच्यासोबत 30 ऑगस्ट रोजी शेवटचे बोलणे झाले असून त्याचा मोबाईल बंद येत असल्याचे पोलिस पथकाच्या निर्दर्शनास आले. त्याचा जवळच्या नातेवाईकांनी घातपात केला असल्याच्या पत्रातील वृत्ताला एक प्रकारे पुष्टी मिळत गेली.
अमोल वर्हे या तरुणाचे वडील सोमनाथ आसाराम वर्हे (50), भाऊ भिमराज सोमनाथ वर्हे (24), किरण सोमनाथ वर्हे (20) सर्व. रा. नगरसुल, ता. येवला या सर्वांची कसून चौकशी करण्यात आली. त्या चौकशीतून तिघांनी कबुल केले की पितृपक्षातील रविवारच्या रात्री साडे नऊ वाजेच्या सुमारास राहत्या घरात त्याचा दोरीने गळा आवळून खून करण्यात आला आहे. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह रात्रीच दगडाला बांधून गोदावरी नदीच्या वाहत्या पाण्यात मळेगाव (ता.कोपरगाव) येथे फेकून देण्यात आला आहे.
खून करण्यात आलेल्या अमोल वर्हे या तरुणास दारुचे भारी व्यसन होते. दारु पिवून आल्यानंतर तो आईवडीलांना मारहाण करत असे. घटनेच्या दिवशी देखील त्याने आईवडीलांना दारुच्या नशेत मारहाण केली होती अशी कबुली सोमनाथ वर्हे यांनी पोलिसांना दिली.
या घटनेनंतर कुणीही पोलिस स्टेशनला त्याच्या बेपत्ता होण्याबाबत मिसींग दाखल करण्यास आला नाही. मात्र पोलिसांना मिळालेल्या निनावी पत्राच्या माध्यमातून या खूनाच्या घटनेला वाचा फुटली. या खुन प्रकरणी तिघा पिता पुत्रांना अटक करण्यात आली असून मृतदेहाचा शोध सुरु करण्यात आला आहे. या प्रकरणी येवला तालुका पोलिस स्टेशनला मयत अमोल वर्हे याचे वडील वडील सोमनाथ आसाराम वर्हे (50), भाऊ भिमराज सोमनाथ वर्हे (24), किरण सोमनाथ वर्हे (20) सर्व. रा. नगरसुल, ता. येवला यांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरुद्ध भाग 5 गु.र.न. 368/20 भा.द.वि. 302, 201, 109, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास येवला तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. अनिल भवारी व त्यांचे सहकारी करत आहेत.