जळगाव : भारतीय जनता पक्षाचे सरकार असतांना तत्कालीन भाजपा नेते एकनाथराव खडसे यांच्यावर केलेल्या आरोपामुळे बदनामी झाल्याबद्दल हिवरखेड ता. खामगाव जि. बुलढाणा येथे एक तक्रार दाखल करण्यात आली आहे. सदर तक्रार एकनाथराव खडसे यांचे कार्यकर्ते असलेले माधवराव पाटील यांनी केली आहे. या तक्रारीबद्दल कार्यकर्ता माधवराव पाटील व एकनाथराव खडसे यांचा एक व्हिडीओ लिंकच्या माध्यमातून सोशल मिडीयावर प्रसारीत करण्यात आला आहे. बुलढाणा पोलिसांनी या तक्रारीवरुन योग्य ती कारवाई मनिष भंगाळे विरुद्ध केली नाही तर लोकशाही मार्गाने आंदोलन उभे केले जाणार असल्याचे माधवराव पाटील यांनी व्हिडीओत म्हटले आहे.
जळगाव पोलिसांनी हॅकर मनिष भंगाळे याच्याविरुद्ध अद्याप कोणतीही कारवाई केली नसल्याचे एकनाथराव खडसे यांनी या व्हिडीओच्या माध्यमातून म्हटले आहे. एटीएमच्या माध्यामातून भंगाळे याने विविध खातेदारांच्या खात्यातून पैसे काढून दाखवल्याचे प्रात्यक्षीक पोलिसांना करुन दाखवले आहे. त्याला जळगाव पोलिसांनी एक प्रकारे सरंक्षण दिले असल्याचे एकनाथराव खडसे यांनी म्हटले आहे. त्याच्यावर कारवाई होण्याची मागणी खडसे यांनी केली आहे. दरम्यान आपली सामाजीक हानी झाल्याची तक्रार असलेले एकनाथराव खडसे यांचे नावे असलेले एक पत्र हॅकर मनिष भंगाळे याने सोशल मिडीयावर प्रसारित केले आहे.