नवी मुंबई : फिजिओथेरपीच्या बहाण्याने महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवून, त्यांना अश्लील व्हिडीओ कॉल करणाऱ्या इसमास गुन्हे शाखा पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. एरीक अंकलेसरिया (45) असे अटकेतील इसमाचे नाव आहे. तो बँकिंग क्षेत्राशी निगडीत प्रसिद्ध वक्ता आहे. नवी मुंबई पोलिसांनी एरिक अंकलेसरिया यास माटुंगा येथून अटक केली आहे.
तुर्भे एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिजिओथेरपी करणाऱ्या एका महिला कर्मचाऱ्याने अज्ञात व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. या व्यक्तीने तिला व्हॉट्सॲपच्या माध्यमातून अश्लील व्हिडीओ कॉल केला होता. याप्रकरणी गुन्हे शाखा 1 चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. राहुल राख, रुपेश नाईक, राजू तडवी, हर्षल कदम असे सर्वजण तपास करत होते. ज्या मोबाईल क्रमांकावरुन त्या महिलेला व्हिडीओ कॉल आला होता तो मोबाईल क्रमांक ठरावीक वेळीच वापरला जात असल्याचे पोलिस तपासात समोर आले. त्यानुसार पोलिसांकडून तांत्रिक तपासावर भर देण्यात आला.
रविवारी भांडुप येथून एरीक अंकलेसरिया (45) यास त्याच्या राहत्या घरातून चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान त्याने आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्यावर मुंबई, ठाणे, नवी मुंबई अशा विविध पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत. त्याने पाचशे पेक्षा जास्त महिलांचा विनयभंग केला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यापैकी मुंबईतील एका पॉक्सो गुन्ह्याचादेखील समावेश आहे.
एरीक अंकलेसरिया हा स्वतः डॉक्टर असल्याचे सांगून फिजिओथेरपी सुविधा असलेल्या दवाखान्यांमध्ये फोन करायचा. त्या दवाखान्यांमधे तो एका रुग्णाला गुप्तांगाची थेरपी हवी असल्याचे सांगायचा. त्यानंतर स्वतःच दवाखान्यात जावून थेरपीच्या वेळी महिलांचे मोबाइल क्रमांक मिळवत असे. मोबाईल क्रमांक मिळाल्यानंतर काही दिवसांनी त्या महिलेलांना तो अश्लील व्हिडीओ कॉल करायचा. पकडले जाण्याच्या भितीमुळे तो प्रत्येक महिलेला फक्त एकदाच संपर्क साधायचा. त्यासाठी तो वेगळा मोबाइल क्रमांकाचा वापर करत असे. मात्र, एकाच दिवशी त्याने कोलकाता व मुंबई येथून दोघा महिलांना कॉल केला. पोलिसांनी त्या दिवशी विमान प्रवाशांची यादी तपासली असता त्यात एरीक अंकलेसरिया याचे नाव तपासात पुढे आले.