गणेशचा मृतदेह पोलिसांनी जेसीबीने खणून काढला ! सचिनच्या लफड्यासह खूनाचा शोध कसून लागला !!

औरंगाबाद : चार चौघात खुलून दिसणारी ती एक विवाहीता होती. विवाहीता असल्यामुळे साहजिकच पत्नी आणि आई अशा दोन्ही भुमिका ती पार पाडत होती. पती व मुले असा तिचा संसार होता. असे असले तरी चंचल मनाची ती विवाहीता गावातील एका तरुणाच्या प्रेमात पडली होती. तारुण्याच्या लाटेवर स्वार झालेल्या त्या तरुणाचे नाव सचिन ज्ञानेश्वर पंडीत असे होते. सचिन दिसायला एखाद्या राजकुमारासमान होता. तसे बघता तिचा संसार व्यवस्थित सुरु होता. परंतु आकर्षक सिक्स पॅक असलेल्या सचिनच्या मोहात आणि प्रेमात ती पडली. त्यामुळे साहजिकच पतीपेक्षा तिचे मन सचिनमधे गुंतले होते. 

औरंगाबाद जिल्ह्याच्या गंगापुर तालुक्यापासून जवळच अंमळनेर या गावी सचिन ज्ञानेश्वर पंडीत हा पंचविशीतील तरुण रहात होता. सचिन हा पंचवीस वर्ष वयाचा तरुण होता. गावातील त्या विवाहितेचा सचिनसोबत नजरेचा खेळ काही केल्या कमी होत नव्हता. ती त्याला योग्य प्रमाणात प्रतिसाद देत असल्यामुळे सचिन देखील तिला उच्च प्रतीचा प्रतिसाद देवून तिला एक प्रकारे प्रोत्साहन देत होता. एकंदरीत दोघांचे एकमेकांवर प्रेम जडले होते. ते निखळ प्रेम म्हणता येणार नव्हते. ते केवळ एक शारीरिक आकर्षण होते. विशिष्ट वयात शारिरीक आकर्षणातून निर्माण झालेल्या ओढीला प्रेम हे नाव दिले जाते. तसाच काहीसा प्रकार सचिन आणि त्या विवाहितेसोबत झाला होता. 

सचिनचा एक मित्र होता. गणेश दामोदर मिसाळ असे त्या मित्राचे नाव होते. गणेश हा सचिन पेक्षा चार वर्षांनी मोठा होता. दोघेही मौजमस्ती करणारे मित्र होते. लहानशे गाव असल्यामुळे साहजिकच दोघा मित्रांच्या दररोज भेटीगाठी होत असत. दोघे मनमौजी तरुण मित्र असल्यामुळे त्यांची भिरभिरती नजर गावातील महिलांवर रहात होती. गणेशपेक्षा सचिन एक पाऊल पुढे होता. त्याने गावातील त्या विवाहितेला गटवले होते. त्या बाबतीत गणेश मागे होता.

पती घरी नसला म्हणजे ती विवाहिता सचिनसोबत जवळीक साधण्याचे काम करत होती. सचिनच्या या सर्व कारनाम्यांची गणेशला अजुन भणक लागलेली नव्हती. सचिनने देखील गणेशला या प्रकाराची माहिती दिली नव्हती. एकंदरीत सचिन व त्या विवाहितेचे प्रेमप्रकरण आकार घेत होते. ती आपल्यावर खुश असल्याचे बघून संधी साधून तिच्यासोबत शैय्यासोबत करण्याचा सचिनचा प्लॅन होता. त्या दृष्टीने त्याचे नियोजन सुरु होते. 

काही ना काही निमित्ताने सचिन तिच्या घरी जायचा आणि संधी साधून तिच्याशी जवळीक साधत होता. कालांतराने दोघे एकमेकांच्या खुप जवळ आले होते. दोघे एकमेकांना स्पर्श करु लागले. एके दिवशी संधी साधून त्याने तिला आपल्या घरी कुणी नसतांना बोलावले. तिने देखील त्याचा प्रस्ताव स्विकारला होता.

त्या दिवशी ती आणि सचिन असे दोघे जण शैय्यासोबत करण्यासाठी गुपचुप एकत्र आले. दोघांचा खेळ रंगात आला असतांना अचानक सचिनचा मित्र गणेश त्याला भेटण्यासाठी तेथे आला. खोलीत काय सुरु आहे याची त्याला काहीच कल्पना नव्हती. तो नेहमीप्रमाणे सचिनला भेटण्यासाठी आला होता. गणेश सरळ दार ढकलून आत गेला. आत गेल्यावर समोरचे दृश्य बघून तो काहीवेळ गर्भगळीत झाला. त्याचा मित्र सचिन व गावातील ती विवाहिता असे दोघेही त्याला नको त्या अवस्थेत दिसले होते. गणेशला बघून सचिन व ती महिला असे दोघेजण भांबावले. रंगाचा बेरंग झालेल्या दोघांनी सामान्य अवस्थेत येण्याचा कसोशीने प्रयत्न केला.

गणेशला बघून ती विवाहीता तातडीने तेथून निघून गेली. मात्र ती निघून गेल्यावर सचीनची अवस्था बघण्यासारखी झाली होती. त्याचा चोरीचा मामला गणेशने पकडला होता. सचिनचे त्या विवाहितेसोबत असलेले संबंध गणेशला माहिती झाले होते. त्यामुळे गणेशपुढे सचिन हतबल झाला होता.

गणेशने त्याचे त्या विवाहितेसोबत असलेले संबंध पाहून घेतल्यामुळे सचिन पुरता अडचणीत सापडला होता. गावात तुझे व त्या विवाहितेचे संबंध उघड करेन अशी भिती सचिनला घालण्याचे काम गणेश करु लागला. वेळप्रसंगी तो सचिनकडून पैसे देखील उकळू लागला.

आपले संबंध गणेशला माहिती झाल्यामुळे ती विवाहिता देखील सचिनकडे येण्याचे टाळू लागली. ती पुर्वीसारखी सचिनला प्रतिसाद देखील देत नव्हती. ती देखील तिच्या बदनामीला घाबरत होती. गणेशने आपल्या घरी सांगीतले तर आपला संसार मोडला जाईल अशी भिती त्या विवाहितेला वाटत होती. तिच्यासारखीच अवस्था सचिनची झाली होती. सचिनदेखील गणेशला घाबरुन रहात होता. या संधीचा फायदा घेत गणेशने सचिनचा छळ सुरु केला होता. 

आता तर गणेशचे धाडस वाढले होते. मला देखील त्या विवाहितेसोबत भेट घालून दे आणी तुझ्यसारखे सुख लुटू दे अशी थेट मागणी गणेशने सचिनकडे केली. त्याची ही अवाजवी मागणी बघून सचिन अस्वस्थ झाला होता. सचिन घाबरला असल्याचे गणेशच्या लक्षात आले होते. तो त्याच्या मनात जास्तच भिती घालू लागला.

गणेशमुळे सचिनची झोप उडाली होती. या समस्येवर सचिन उपाय शोधत होता. गणेशला या जगातून कायमचे हद्दपार करण्याचे सचिनने आता मनाशी ठरवले. त्या दृष्टीने तो कामाला लागला.  याकामी त्याने गावातील त्याचा मित्र पप्पू उर्फ रविंद्र कारभारी बुट्टे याला सोबत घेतले व तयार देखील केले.

 दि. 5 ऑक्टोबर 2019 रोजी सचिनने गणेशला फोन करुन बोलावून घेतले. तुझी तिच्यासोबत भेट घालून देतो असे आमिष त्याने त्याला दाखवले. आपल्याला त्या विवाहितेसोबत शैय्यासोबत करण्याची नामी संधी मिळत असल्याचे समजताच गणेश मनोमन खुष झाला. त्याच्या आनंदाला पारावार राहीला नाही. मात्र आपल्याला बोलावणा-या सचिनच्या मनात काय सुरु आहे याची कल्पना गणेशला नव्हती.

मिळालेल्या निरोपानुसार गणेशने सचिनकडे हजेरी लावली. त्याठिकाणी अगोदरच सचिनसोबत पप्पू बसलेला होता. गणेशने सचिनला ती कुठे आहे? असे कोड्यात विचारले. त्यावर सचिनने त्याला म्हटले की बस, येईल थोड्या वेळाने. त्यानंतर इकडच्या तिकडच्या गप्पा करत सचिन व पप्पू या दोघांनी मिळून त्याला दारु पाजली. मात्र गणेशचे दारु पिण्यात लक्ष लागत नव्हते. त्याला ती हवी होती. त्यामुळे गणेशच्या मनाची घालमेल सुरु झाली होती. तो सारखा सारखा सचिनला ती कुठे आहे? ती केव्हा येईल असे विचारत होता. अखेर गणेशने सचिनसोबत वाद घालण्यास सुरुवात केली. वाद वाढत गेल्यामुळे गणेशने त्याच्याजवळ असलेले धमकी व बदनामीचे अस्त्र उपसले. थांब आता तुझे व तिचे संबंध उघडच करतो अशी धमकी तो सचिनला देवू लागला. मात्र आज गणेशला या जगातून कायमचे बाद करण्याचे सचिनने मनाशी ठरवले होते. त्यासाठी त्याने मदतीला पप्पू उर्फ रविंद्र बुट्टे यास बोलावून घेतले होते.

पुन्हा काही वेळाने ती येत आहे असे सचिनने गणेशला म्हणत दारुचा पेग पिण्यास भाग पाडले. गणेशवर दारुचा अंमल  होण्यास सुरुवात झाली होती. दरम्यान संतापाच्या भरात सचिनने पप्पूच्या मदतीने गणेशवर धारदार शस्त्राने हल्ला केला. हल्ला होताच गणेश रक्ताच्या थारोळ्यात जमीनीवर कोसळला. पुन्हा दोघांनी त्याच्यावर धारदार शस्त्राने जोरदार वार केला. त्यानंतर दोघांनी मिळून त्याच्या गळ्याभोवती दोरीचा फास टाकून तो आवळण्यास सुरुवात केली. गळ्याभोवती दोरीचा फास आवळला गेल्यामुळे गणेशने आपला जिव सोडला. गणेश मेल्याची खात्री झाल्यावर दोघांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचे नियोजन सुरु केले. त्यांनी रातोरात त्याचा मृतदेह अमळनेर येथील शेतशिवारात एक खड्डा तयार करुन त्यात पुरुन टाकला.

घटनेच्या रात्री 5 ऑक्टोबर 2019 रोजी घराबाहेर गेलेला गणेश घरी परत आलाच नाही. त्यामुळे त्याच्या घरातील सदस्यांनी त्याचा शोध सुरु केला. मात्र तो घरी परत आला नाही तसेच त्याचा कुठे शोध देखील लागला नाही. अखेर चौथ्या दिवशी 8 ऑक्टोबर 2019 रोजी गंगापूर पोलिस स्टेशनला त्याच्या बेपत्ता होण्याबाबत मिसींग दाखल करण्यात आली. बघता बघता वर्ष उलटून गेले तरी देखील त्याचा शोध लागत नव्हता.

बेपत्ता गणेशचे मोबाईल कॉल डिटेल्स काढण्यात आले. त्याच्या मित्रांकडे चौकशी करण्यात आली. हळू हळू चौदा महिन्यांचा कालावधी लोटला. या कालावधीत आपले आता काहीच वाकडे होणार नाही व गणेशचा तपास बंद होईल असे समजून सचिनचे त्या विवाहितेसोबत असलेले त्याचे संबंध पुर्ववत सुरु केले. जणू काही झालेच नाही अशा अविर्भावात सचिन वावरत होता.

सत्य लपत नाही असे म्हणतात. दरम्यान एका खब-याने 12 डिसेंबर 2020 रोजी गंगापूर पोलिसांची भेट घेत एक गुप्त खबर त्यांना दिली. त्या खब-याने पोलिसांना माहिती दिली की गणेश मिसाळ या तरुणाचा खून झाला असून त्याचा मृतदेह शेतात पुरण्यात आला आहे. त्या खब-याने सचिन पंडीत व पप्पू बुट्टे या दोघांची नावे देखील गंगापूर पोलिसांना सांगीतली.

गंगापूर पोलिसांना मिळालेल्या माहीतीनुसार अमळनेर येथील पाडुरंग गाडे याच्या शेतातील जमीनीत जेसीबीच्या मदतीने खड्डा खणून गणेशचा पुरलेला मृतदेह बाहेर काढण्यात आला. या घटनेला तब्बल चौदा महिन्याचा कालावधी लोटला होता. त्यामुळे हाडांचा केवळ पिंजरा तेवढा शिल्लक राहिला होता. पोलीसांनी त्या सांगाड्याचा पंचनामा करत तो पुढील कायदेशीर कारवाईसाठी रासायनिक प्रयोग शाळेत रवाना केला.

गणेश दामोदर मिसाळ याच्या खून प्रकरणी संशयीत म्हणून त्याचा मित्र सचिन ज्ञानेश्वर पंडित व पप्पू ऊर्फ रविंद्र कारभारी बुट्टे यांच्या विरोधात भा.दं.वि.302, 201, 364, 365, 120 (ब) या कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोघा जणांना न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला दोघांना पाच दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

या घटनेचा तपास गंगापूर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे व त्यांचे सहकारी स.पो.नी.प्रल्हाद मुंढे, पो.हे.कॉ.कैलास निभोरकर, विजय भिल्ल, पो.ना.संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकुटे, मनोज बेंडवाल, गणेश लिमणे, दतात्रय गुंजाळ आदी करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here