नवी दिल्ली: देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे सल्लागार तथा “द एक्सिडेंटल प्राईम मिनिस्टर” या पुस्तकाचे लेखक संजय बारू यांची ऑनलाईन दारु खरेदीत फसवणूक झाली आहे. ऑनलाईन दारु विकण्याच्या नावाखाली संशयीतांनी बारु यांना 24 हजार रुपयांचा गंडा घातला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपीस अटक केली असून तो कॅब ड्रायव्हर असल्याची माहिती पुढे आली आहे. बारु यांनी दारु खरेदीसाठी ऑनलाईन दुकान सर्च केले होते.
बारु यांनी सर्च केलेल्या दुकानाचे नाव La Cave Wines & Spirits असे होते. बारु यांनी या शॉपच्या फोन नंबरवर डायल केल्याननंतर दुकानदाराने त्यांच्याशी संवाद साधला. बोलणी नंतर बारु यांनी ऑनलाईन 24 हजार रुपयांचे पेमेंट अदा केले होते. मात्र, पेमेंट झाल्यानंतर तो नंबर बंद झाला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर संजय बारू यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत संबंधीताला अटक केली आहे. अटकेतील आरोपीताने केलेल्या फसवणुकीची कबुली देत सांगितले की तो व त्याचा मित्र बनावट नावाने सीमकार्ड खरेदी करतात. या नंबरद्वारे कॉल करुन आपण लोकांची फसवणूक करतो. देशाच्या विविध राज्यांमध्ये आपले बँक खाते असून एखाद्या ग्राहकाने खात्यात रक्कम टाकल्यानंतर ती रक्कम तात्काळ दुसऱ्या राज्यातील खात्यात वर्ग केली जाते. तेथून ती रक्कम संबंधित आरोपीच्या खात्यात जमा होते.