जळगाव : सध्या थंडीचा कहर सर्वत्र वाढला आहे. या थंडीमुळे चार भिंतीत राहणा-याची तब्येत बिघडते. मात्र रस्त्यावर जीवन व्यतीत करणाऱ्या कित्येक गोरगरिबांकडे थंडीपासून बचाव करण्यासाठी साधी चादर देखील नसते. हा माणुसकीचा विचार बाळगून गोरगरिबांना ब्लॅंकेटची मदत करुन समाजहित जोपासणारे पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या कार्याची दाद द्यावी लागेल.
जामनेर पोलिस स्टेशनला कार्यरत असलेल्या पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे प्रत्येक वर्षी थंडीत कुडकुडणा-या गोरगरिबांना ब्लॅंकेट देवून खाकीतील समाजसेवेचा एक भाग बनत आहेत.
खाकी वर्दीतील भारदस्त व्यक्तिमत्व पाहिल्यावर कायदा राबवणारा कठोर मनाचा अधिकारी अशी सर्वसामान्य लोकांची समजूत असते.मात्र याला पोलीस निरीक्षक प्रताप इंगळे अपवाद म्हणावे लागतील.
दरवर्षी थंडीचा कहर आला म्हणजे पो.नि.इंगळे ब्लॅंकेटच्या माध्यमातून गोरगरिबांना खाकीची ऊब देण्याचे काम करत असतात. यावेळी देखील त्यांनी जामनेर शहरात रस्त्यावरील बेसहारा लोकांना ब्लॅंकेट वितरित करण्याचे समाजसेवी काम केले आहे. यावेळी त्यांच्या समवेत पो. हे. कॉ. रमेश कुमावत, युथ एज्युकेशन अँड वेलफेअर सोसाईटी चे अध्यक्ष नितीन सुराणा, व पोलीस स्टेशनचे इतर कर्मचारी होते.
युथ एज्युकेशनचे संस्थापक अध्यक्ष नितीन सुराणा यांनी निराधार व्यक्तीसाठी कार्य करणाऱ्या त्यांच्या संस्थेची यावेळी उपस्थितांना माहिती दिली. यावेळी संस्थेचे सदस्य दिपक कंडारे, दिपक माळी पत्रकार किरण चौधरी, पो.हे.कॉ. शाम काळे आदी उपस्थित होते.