जळगाव : लाठ्याकाठ्यांचा सर्रास वापर करत एकाला मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याची घटना अमळनेर शहरात घडली. सरत्या वर्षाच्या अखेरीस रात्री आठ वाजेच्या सुमारास म्हाडा कॉलनीत सदर घटना घडली.
31 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे व कमल मुनिर पथरोड यांच्यात वाद सुरु होता. दोन्ही एकमेकांसोबत मोठमोठ्याने वाद घालत होते. दरम्यान राजेश सिद्धी जाधव यांनी त्यांच्यात सुरु असलेले भांडण पाहिले. हा वाद काहीवेळाने शांत होईल असे वाटल्याने राजेश जाधव यांनी त्याकडे दुर्लक्ष केले होते.
रात्री आठ वाजेच्या सुमारास शीतल मुकेश सैंदाणे, मुकेश गोकुळ सैंदाणे व भाग्यश्री उर्फ भुरी राजेंद्र पाटील या तिघांनी मिळून कमल पथरोड यास बोलावले. दुपारी झालेल्या वादाचा पुढील भाग म्हणून तिघांनी लाठ्याकाठ्यांचा वापर करत कमल यास बेदम मारहाण सुरु केली. या मारहाणीत कमलचा मृत्यू झाला.
या घटनेची माहीती मिळाल्यानंतर रात्री साडेदहा वाजता डीवायएसपी राकेश जाधव, पोलीस निरीक्षक अंबादास मोरे व पथकाने घटनास्थळी धाव घेतली. तपासाची चक्रे फिरवत पोलिस पथकाने तिघा मारेक-यांना ताब्यात घेत अटक केली. त्यांच्याविरुद्ध खून व अॅट्रॉसिटीचा गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास डिवायएसपी जाधव करत आहेत.