एरंडोल नजीक ट्रक उलटला – क्लिनर ठार

जळगाव : चोपडा येथून कपाशीच्या गाठी भरलेला ट्रक एरंडोलमार्गे सेलवाससाठी जात होता. दहा टायर ट्रक धरणगाव एरंडोल रस्त्यावर टोळी गावानजीक अचानक उलटला. या घटनेत क्लीनर लायक युनूस पिंजारी (30) रा. कटकर गल्ली, एरंडोल हा दुर्दैवाने ट्रकखाली दाबला गेला व त्यात त्याचा मृत्यू झाला. ट्रकचालक मनोज श्रावण मराठे व ट्रकमालक हितेंद्र परदेशी हे दोघे जण गंभीर जखमी झाले आहेत. आज शनिवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास टोळी गावानजीक हा अपघात घडला आहे.

एरंडोल येथील (एमएच 19 झेड 3595) दहाचाकी ट्रक चोपडा येथून कपाशीच्या गाठी घेवून धरणगावमार्गे मार्गक्रमण करत होता. टोळी गावापासून जवळच असलेल्या रोपवाटिकेजवळ पलीकडून आलेल्या ट्रकने कट मारल्याने कपाशीच्या गाठी भरलेल्या ट्रकचालक त्याच्या ताब्यातील ट्रक वाचवण्याच्या प्रयत्नात होता. दरम्यान त्याने ट्रक रस्त्याच्या खाली उतरवल्याने उलटला. त्यात ट्रक मधील क्लिनर लायक युनुस पिंजारी हा ट्रक खाली दाबला गेला व त्याचा जागीच मृत्यू झाला. ट्रकचालक मनोज श्रावण मराठे व ट्रक मालक हितेंद्र परदेशी हे दोघे जबर जखमी झाले आहेत. दोघा जखमींवर एरंडोल येथील खाजगी रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत.

या प्रकरणी एरंडोल पोलिस स्टेशनला भा.दं.वि. कलम 304 अ, 279, 337, 338 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेड कॉन्स्टेबल विकास देशमुख, राजू पाटील, संदीप सातपुते पुढील तपास करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here