जळगाव : इंडीया बुल धनी लोन मधून मॅनेजर बोलत असल्याचे भासवून तिन लाख रुपयात फसवणूक करणा-या सायबर गुन्हेगारास सायबर पोलिसांच्या पथकाने मोठ्या शिताफीने ताब्यात घेण्यात यश मिळवले आहे. सायबर गुन्हेगारांची टोळी वास्तव्य करणा-या झारखंड राज्यातील दुर्गम अशा कुविख्यात जामताडा भागातून आरोपीस आणल्याबद्दल सायबर पोलिस कौतुकास पात्र ठरले आहे. मात्र ताब्यातील आरोपीच्या माध्यमातून विविध गुन्हे उघडकीस आणणे देखील एक महत्वाचा भाग ठरणार आहे.
नितीन आनंदराव निकम (धामणगाव ता. चाळीसगाव) हे शेतकरी आहेत. पोलिसांनी पकडून आणलेल्या मजहर अन्सारी पिता छोटा जमाल मिया (26) या तरुणाने जुलै 2019 या कालावधीत नितीन निकम यांना वेळोवेळी फोन केला. आपण इंडीया बुल धनी लोन येथील मॅनेजर बोलत असल्याचे त्याने भासवले. तिन लाख रुपयांचे कर्ज कमी व्याजदराने देण्याचे आमीष दाखवून त्याने नितीन निकम व त्यांची पत्नी अशा दोघांचे आधारकार्ड, एटीम कार्डचा फोटो व्हाटस अॅपच्या माध्यमातून मागवून घेतला. नितीन निकम यांच्या मोबाईलवर आलेल्या ओटीपीची माहिती घेवून निकम पती पत्नीच्या बॅंक खात्यातून 1 लाख 59 हजार 701 रुपये मजहर अन्सारी याने ऑनलाईन वळते करुन घेतले.
या प्रकरणी सायबर पोलिस स्टेशनला भा.द.वि. कलम 420 सह माहिती तंत्रज्ञान अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली पो.नि. बळीराम हिरे व त्यांचे सहकारी पोलिस उप निरिक्षक अंगद नेमाने, पो.हे.कॉ. बाळकृष्ण पाटील, पोलीस नाईक दिलीप चिंचोले, पो.कॉ. ललित नारखेडे, अरविंद वानखेडे, श्रीकांत चव्हाण, गौरव पाटील करत होते. या पथकाने अतीदुर्गम भागात जावून सापळा रचून अलगचुवा पो. शितलपूर ता. कर्मतांड जिल्हा जामताडा या झारखंड राज्यातील भागातून मजहर अन्सारी यास ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून त्याने गुन्ह्यात वापरलेले मोबाईल, एटीएम कार्ड, पॉस मशीन असे साहित्य ताब्यात घेतले. त्याला न्यायालयात हजर केले असता 5 जानेवारी पर्यंत पोलिस कोठडी मिळाली आहे.