शिरपूर : जळगाव येथील राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेतर्फे माया प्रदीप साळुंखे यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. माया साळुंखे या अहिराणी कवयित्री असून त्या शिरपुर तालुक्यातील भटाणे येथील रहिवासी आहेत. लवकरच या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संस्थेच्या अध्यक्षा संदिपा वाघ यांनी तसे कळवले आहे.
अहिराणी कविता व साहित्यामध्ये माया साळुंखे यांनी एक आगळा वेगळा ठसा निर्माण केला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न, स्त्रीयांवरील अत्याचार, स्त्री भृण हत्या यासह हुंडाबळी व इतर अनेक विषयांवर आपल्या कवितांच्या माध्यमातून माया साळुंखे यांनी प्रकाशझोत टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या कवितांच्या माध्यमातून त्यांनी जनजागृती केली आहे.
जागतिक महामारी कोरोना काळात त्यांनी रचलेल्या कवितांमधून त्यांनी योग्य रितीने जनजागृती केली होती. कोरोना विषयावरील त्यांनी रचलेली कविता सोशल मिडीयावर गाजली होती. राज्यस्तरिय ग्रामीण अहिराणी साहित्य संमेलन पिंगळवाडे, तिसरे अहिराणी साहित्य संमेलन बहादरपूर, खान्देशी विश्वकर्मीय बहुभाषिक कविसंमेलनात त्यांनी सहभाग घेतला होता. या माध्यमातून त्यांनी नावलौकीक प्राप्त केला आहे. नाशिक येथील अहिराणी कविसंमेलनात देखील त्यांच्या कार्याची योग्य ती दखल घेण्यात आली होती.
त्यांच्या या कार्याची दखल घेत राजनंदिनी बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा सौ संदीपा वाघ, कुणबी मराठा वधूवर गृप गौरी उद्योग समूहाचे संस्थापक अध्यक्ष सुमित पाटील यांनी त्यांना नारीरत्न पुरस्कार जाहीर केला आहे.