चोरी गेलेला मोबाईल मिळाला परत

जळगाव : चोरी गेलेला मोबाईल परत मिळण्याची आशा सोडून दिली असतांना तो परत मिळाल्यामुळे मोबाईल धारक अनिल शिंदे यांनी तालुका पोलिस स्टेशनचे पो.नि. रविकांत सोनवणे व त्यांचे सहकारी विश्वनाथ गायकवाड यांचे आभार मानले आहे.

जळगाव सत्र न्यायालयात कार्यरत असलेले अनिल शिंदे यांचा मोबाईल गेल्या ऑक्टोबर महिन्यात चोरीला गेला होता. चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी त्यांच्या घरासह शेजारच्या चार घरांच्या बाहेरील कड्या लावून घेतल्या होत्या. हाँलमधील खिडकीचा लाँक ब्रेक करुन खिडकीपासून जवळच असलेला बेडवरील मोबाईल चोरट्यांनी सफाईदारपणे गायब केला होता. एवढे कमी झाले की काय चोरट्याने पोर्चमधील चप्पल-बुटांचे स्टँण्डदेखील चोरुन नेले होते.

सकाळी शेजारचे मनोज रायसिंगे नेहमीप्रमाणे बाहेर फिरायला जाण्याची तयारी करत असतांना त्यांच्या लक्षात आले की आपल्या घराचा दरवाजा बाहेरुन लावण्यात आलेला आहे. त्यांनी अनिल शिंदे यांना फोन लावला असता तो फोन लागला नाही. प्रत्येकाच्या घराच्या कड्या चोरट्याने बाहेरुन लावल्या होत्या.
या चोरीच्या घटनेबाबत अनिल शिंदे यांनी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला रितसर फिर्याद दाखल केली होती. या चोरीच्या गुन्ह्याचा तपास पो.नि. रविकांत सोनवणे यांनी त्यांचे सहकारी विश्वनाथ गायकवाड यांचेकडे सोपवला. विश्वनाथ गायकवाड यांनी आपले कसब तसेच तांत्रीक मदत घेत चोरट्याचा माग काढण्यात यश मिळवले. अखेर चोरीला गेलेला मोबाईल चोरट्यासह हस्तगत करण्यात आला.

चोरी गेलेला मोबाईल परत मिळाल्यामुळे अनिल शिंदे यांनी समाधान व्यक्त केले. पोलीस प्रशासनाविषयी जनमाणसांत अनेक बरे – वाईट अनुभव, समज- गैरसमज रुढ झालेले असतात. कधी कधी पोलिस प्रशासनाच्या एकूण कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येतात. मात्र दुसरी बाजू तपासून पाहिली तर पोलिस प्रशासनावर असलेला कामाचा ताण देखील समोर येत असतो. पोलिस प्रशासनात आपले सेवाकार्य चोखपणे बजावणा-या सक्षम, कर्तव्यदक्ष पोलिस अधिकारी व कर्मचारी वर्गामुळे अनेक सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या जातात. तपासाच्या योग्य दिशेने काम केल्यामुळे अनेक लहान – मोठे गुन्हे उघडकीस येत असतात. परिणामी जनमानसात पोलीस प्रशासनावरची विश्वासार्हता अधिक बळकट होत असते. असाच चांगला आणि सुखद अनुभव अनिल शिंदे यांना आल्यामुळे त्यांनी आपले अनुभव कथन केले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here