जळगाव : मित्र – मैत्रीणींसमवेत बोलणा-या तरुणाच्या गळ्याला चाकू लावून मारहाण करत रोख रक्कम व सोने, चांदीचे दागीने हिसकावून नेणा-या तरुणास भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भुसावळ शहरातील गुंडगिरी वारंवार समोर येत असल्याचे विविध घटनेतून दिसून येत आहे. सचिन शाम खरारे(22) असे ताब्यातील गुंड प्रवृत्तीच्या तरुणाचे नाव असून त्याची ओळख परेड अद्याप बाकी आहे.
मोहन रमेश घुले (19) हा तरुण 2 जानेवारी रोजी भुसावळ शहरातील स्टार लॉन जवळ आपल्या मित्र व मैत्रीणींसमवेत बोलत उभा होता. त्यावेळी तेथे अनोळखी चार इसम आले. त्यांनी मोहन घुले या तरुणाच्या मानेवर चाकू लावून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच मोहन घुले याच्या कब्जातील रोख रुपये 4600 तसेच सोन्या चांदीचे दागीने बळजबरी हिसकावून नेले होते. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलिस स्टेशनला भाग 5 गु.र.न. 8/2021 भा.द.वि. 394, 506, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात मिळालेल्या गुप्त माहितीनुसार पो.नि. दिलीप भागवत यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. कृष्णा भोये, गणेश धुमाळ, अनिल मोरे, मंगेश गोठला, स.फौ.तस्लिम पठाण, पो.ना. रविंद्र बिऱ्हाडे, रमण सुरळकर, उमाकांत पाटील, पो.कॉ. विकास सातदिवे, प्रशांत परदेशी, ईश्वर भालेराव, चेतन ढाकणे, कृष्णा देशमुख, रविंद्र तायडे यांच्या पथकाने सचिन शाम खरारे(22) यास वाल्मिक नगर भागातून ताब्यात घेतले. त्याची ओळख परेड अद्याप बाकी आहे.