जळगाव : रावेर येथील मकबूल शेख, कालू शेख,आदिल खान व मधु पैलवान यांच्या विरुद्ध जिल्हाधीकारी जळगाव यांनी केलेली एमपीडीए ची कारवाई औरंगाबाद उच्च न्यायालयाने रद्दबातल केली आहे.
रावेर दंगलीतील पाच संशयिताविरुद्ध महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड, हातभट्टीवाले, औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार, धोकादायक व्यक्ती, वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तूचा काळाबाजार करणे अशा विधातक कृत्यांना आळा घालण्याबाबतच्या अधिनियम सन 1981 सुधारणा अधिनियम 2015 चे कलम 3(2) नुसार जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत यांनी स्थानबद्ध करण्याच्या कारवाईचे दिले होते.
शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालु शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान, मधुकर उर्फ मधु पैलवान व एका जण अशा पाच व्यक्तींविरुद्ध हे एका वर्षासाठी स्थानबद्धतेचे आदेश होते. या पाचही जणांना 19 सप्टेबर 2020 रोजी पारित केलेल्या आदेशानुसार नाशिक मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले होते.
शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालु शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान, मधुकर उर्फ मधु पैलवान या चौघा जणांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. 4 जानेवारी 2021 रोजी न्या. टी. व्ही. नलावडे व न्या. एम. जी. शेवलीकर यांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण आले होते. चोघा संशयीतांच्या वतीने औरंगाबाद येथील अॅड. जयदीप चटर्जी यांनी तर सरकारतर्फे सरकारी वकील एम. एम. नेरलीकर यांनी बाजु मांडली. अॅड. चटर्जी यांना रावेर येथील अॅड. शिंदे यांनी सहकार्य केले.
रावेर येथे झालेल्या दंगलीत 22 मार्च 2020 रोजी शेख मकबूल अहमद मोहिनुद्दीन, शेख कालु शेख नूरा, आदिल खान ऊर्फ राजू बशीर खान, मधुकर उर्फ मधु पैलवान या चौघा जणांवर वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यापैकी मकबूल शेख याच्यावर एकाच दंगलीचे चार गुन्हे होते. शेख कालू यांच्यावर दोन गुन्हे दाखल होते. आदिल खान याच्यावर एक गुन्हा दाखल होता. मधु पैलवान यांच्यावर एका दंगलीचे चार गुन्हे दाखल होते.
पोलिस निरीक्षक रामदास वाकोडे यांनी वरिष्ठांमार्फत 8 सप्टेबर 2020 रोजी गोपनीय अहवाल सादर करुन या आरोपींना स्थानबद्ध करण्याची विनंती केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी फैजपूर यांनी त्याच दिवशी सदर प्रस्ताव पोलीस अधीक्षक जळगाव यांना सादर केला होता. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी 19 सप्टेंबर 2020 रोजी यांना धोकादायक व्यक्ती म्हणून पाचही जणांना एक वर्षासाठी स्थानबद्ध करत नाशिक मध्यवर्ती कारागृहात त्यांची रवानगी करण्यात आली होती.