सध्या आपला महाराष्ट्र “ईडी” प्रकरणाने पुन्हा गाजू लागला आहे. कारण सुमारे सहा वर्षापुर्वी राज्यात राज ठाकरे नामक बुलंद तोफ कानठळ्या बसवणारा आवाज करत होती. लोकसभा निवडणूकीपुर्वी राज्यातल्या जनतेला भाजपाचे मोदीजी आणि अमित शहा हे दोन बडे नेते राजकीय पटलावरुन हद्दपार करण्याचा जोरदार घंटा त्यांनी कसा वाजवला हे जनतेने तेव्हा पाहिले होते. परंतु काहीच दिवसात त्यांना केंद्र सरकरच्या प्रवर्तन निदेशालय तथा अंमलबजावणी संचालनालय म्हणजे “ ईडी” ची नोटीस आली. कोहिनुर मिल जागा खरेदी (सुमारे 450 कोटी) प्रकरणाचे खोदकाम करण्याचा ईडीचा इरादा जाहीर झाला. शेकडो कोटीच्या जमीन खरेदी प्रकरणात खरेदीकारांनी हे करोडो रुपये कसे उभे केले? त्यांचे भागीदार कोण कोण? पार्टनरशीप कंपन्यांचे उत्पन्न, भागीदारी हिस्से, या खरेदीदारांनी वापरलेला पैसा टॅक्स पेड होता किंवा कसे? या आणि अनेक मुद्द्यांवर “ईडी” वाल्यांनी मुंबईत येवून संबंधीतांना घाम फोडला म्हणतात. परिणामी राज्यातून भाजपा हद्दपार करण्याची संबंधीतांची भाषा बदलली. नेत्यांवर आरोप करण्याचा घंटानाद “ मिले सुर मेरा तुम्हारा” असा बदलल्याचे दिसले. भाजपाला हाकलून लावण्याऐवजी राज्यात मजबूत विरोधी पक्ष निवडण्यसाठी मतदान करा अशी प्रचंड नतमस्तक नम्रता दिसून आली.
गेल्या विधानसभा निवडणूकीपुर्वी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पक्षाध्यक्ष शरदराव पवार यांना देखील “ईडी” चा बागुलबुवा दाखवण्याचा प्रयत्न झाला. पण त्यांनी पैलवानकीच्या थाटात “ईडी” ला अंगावर घेण्याचे जाहीर करताच “ईडी” नरमली. आर्थिक झेंगट उगाचच मागे लावल्याने फटका बसण्याची ईडीलाच भिती वाटली असावी. त्यानंतर अलीकडेच भाजपातून एक वजनदार नेते असलेले नाथाभाऊ खडसे यांनी रा.कॉ. त प्रवेश करतांनाच “ईडी लावली तर सीडी बाहेर काढू” अशा शब्दात भाजपालाच खुले आव्हान दिले होते. पुढच्या काळात “ईडी” चा फेरा नाथाभाऊंना घेरणार असे तेव्हाच म्हटले जात होते. भाजपात असतांना मुख्यमंत्री होवू पाहणा-या प्रत्येक स्वप्नाळू नेत्याची कसलेले युवा नेते देवेंद्र फडणवीस यांनी कशी वाट लावली ते महाराष्ट्राने पाहिले. नाथाभाऊंचा राजकीय महत्वाकांक्षेची राखरांगोळी करण्यात पडद्याआड भुमिका बजावणा-या भाजपातील तत्कालीन मंत्र्यांची आर्थिक लफडी – कुलंगडी नजीकच्या काळात बाहेर येणार अशी तेव्हाच हवा पसरली होती. त्याचा पुढचा अध्याय म्हणून जळगावातून सुरु झालेल्या बीएचआर मल्टीस्टेट पतपेढीच्या हजारो कोटीच्या कथित गैर व्यवहाराचे प्रकरण गाजवण्यात आले.
त्यात माजी पालकमंत्री गिरीशभाऊंचे उजवे हात म्हणून कधी काळी वावरलेले सुनिल झवर यांना पोषण आहारासह वाटरग्रेस, जमीन खरेदी प्रकरणात लपेटण्यात आले. त्यात भरीस भर म्हणून जामनेरचे माजी नगराध्यक्ष पारल ललवाणी, पहुरचे प्रफुल्ल लोढा या दोघांनी भाजपा माजी मंत्री – त्यांच्या पी.ए. यांच्या बाबत तोफा डागल्या. अश्लिल सि.डी. क्लिप्स असल्याचे जाहीर करण्यात आले. याच लोढा यांच्या कथनाचा हवाला देत नाथाभाऊंनी ही अप्रत्यक्ष हल्ले चढवले.
मराठा विद्या प्रसारक संस्थेच्या कथित वादात अॅड. विजय पाटील यांनी देखील पत्रकार परिषदेत या संस्थेच्या हजार कोटीच्या मालमत्तेसह संस्था गिळंकृत करणा-यांना उघडे पाडण्यासाठी युद्धाचा पुकारा केला. परंतु काही महिन्यांपुर्वी “जामनेर”च्या दिशेने क्षेपणास्त्रे डागण्याच्या प्रयत्नातील लोढा यांनी दुसरी पत्रकार परिषद घेवून तीच क्षेपणास्त्रे खडसे यांच्यावर डाग्ण्याचा हल्लाबोल केला. त्यामुळे लोढा यांची ही खेळी “कोलांटउडी” तर नव्हे असे बोलले जावू लागले. जिल्ह्यात अशा प्रकारे रा.कॉ. विरुद्ध भाजपा नेते महाजन यांच्यात जुंपल्याचे दिसत असतांना नाथाभाऊंना “ईडी”चे समन्स आल्याच्या वृत्ताने पुन्हा राजकारण तापले.
याच दरम्यान शिवसेना नेते व खासदार संजय राऊत यांना देखील “ईडी” ने घेरल्याचे चित्र निर्माण झाले. गत डिसेंबरच्या शेवटच्या सप्ताहात रा.कॉ.चे नाथाभाऊ खडसे आणि शिवसेनेचे लढवय्ये संजय राऊत “ईडी”चा कसा मुकाबला करणार? या प्रश्नाचे राज्याला लगेच उत्तर मिळाले.
नाथाभाऊंना कोरोनाची बाधा झाल्याच्या वार्तेने त्यांना “ईडी”समोर जाण्यास 14 दिवसांची मुदतवाढ मिळाली. तर संजय राऊत यांनी “सामना” तून भाजपावर जोरदार हल्ले चढवले. भाजपाच्या तत्कालीन नेत्यांची संपत्ती 1600 पटींनी वाढल्याचा घणाघात त्यांनी केला. अशा प्रकारे 200 नेत्यांची नावे”ईडी” कडे दिल्यास त्यांची चौकशी करणार काय? या त्यांच्या प्रश्नात “ग्यानबाची मेख” आहे.
राजकारण्यांच्या प्रचंड बेनामी संपत्तीची शेकडो प्रकरणे त्यांना सर्वांनाच माहिती असावी. भाजपाच्या एका माजी मंत्र्याची संपत्ती किमान 7000 कोटी ते 27000 कोटीच्या घरात असल्याबद्दलची चर्चा असल्याचे वृत्त मुंबईच्या एका नियतकालिकाने छापले आहे. शिवाय विरोधी पक्षात असतांना भाजपाचे किरीट सोमय्या यांनी तत्कालिन एका मंत्र्याची 2500 कोटीच्या संपत्तीची तक्रार केली होती. याच राजकीय गदारोळात जळगाव जागृत जनमंच संघटनेचे अध्यक्ष शिवराम पाटील यांनी तर माजी मंत्री एकनाथराव खडसे यांना अलिकडेच कोरोना लक्षणे दिसण्याच्या मुद्द्यावर संशय व्यक्त केला आहे. “ईडी” पासून बचाव करण्यासाठी तुर्तास केलेला हा “बनाव” असल्याचे सांगणा-या शिवराम पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्यासह अनेकांना भेटलेले खडसे आणि कोरोना लक्षणाने घ्यावयाची खबरदारी या अनुषंगाने अनेक प्रश्नांचे मोहोळ उभे केले आहे.
जळगावात शिवराम पाटील यांच्या सारखा जागृत सामाजिक कार्यकर्ता या मुद्द्यावर रान पेटवत असतांना जळगाव जिल्ह्यातील भाजपा मात्र ही नामी संधी सोडून तोंडाला कुलुप ठोकून गप्प कसा बसला? या प्रश्नाची जनतेत चर्चा सुरु असल्याचे समजते. जागृत जनमंचने व्यक्त केलेल्या संशयाबद्दल चौकशी झाल्यास त्यांचा हा दावा खोटा असल्याचे कुणाला म्हणता येईल. परंतु जिल्ह्यात रा.कॉ. ला घेरण्याची नामी संधी भाजपाने दुर्लक्षीत करण्यामागे सीडी ची भिती की आजी माजी नेत्यांची “मांडवली” तर नव्हे?
सुभाष वाघ (पत्रकार – जळगाव) 8805667750