जळगाव : कृषी क्षेत्रातील प्रख्यात उद्यमी आणि गांधी विचारांची ट्रस्टीशीप स्वीकारणारे, तत्त्वशील विचारवंत, श्रद्धेय डॉ. भवरलालजी जैन यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या गांधी रिसर्च फाऊंडेशनचे सहयोगी असलेले अश्विन झाला व त्यांच्या पत्नी निर्मला झाला या दोघांनी नुकतीच गुजरात विद्यापीठाची पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.
गांधीजींच्या सार्वजनिक कामांसाठी आर्थिक साधने संकलनः प्रयत्न, पद्धती आणि व्यवस्थापन’ या विषयात अश्विन झाला यांनी योग्य रितीने संशोधन केले आहे. जैन हिल्स स्थित गांधी रिसर्च फाऊंडेशनमध्ये अश्विन झालाजी कार्यरत आहेत. गांधीजींच्या फंड रेझिंग या विषयाबाबत हे प्रथम संशोधन आहे. श्रद्धेय भवरलालजी जैन तथा मोठे भाऊ यांनी त्यांना गांधी रिसर्च फाऊंडेशन रेसिंडेट स्कॉलरसाठी संशोधन करण्याची प्रेरणा दिली होती. गांधीतीर्थ मधील वाचनालयातून झाला दाम्पत्यास संशोधनासाठी लागणारे साहित्य वेळोवेळी उपलब्ध झाले होते.
अश्विन झाला यांच्या पत्नी निर्मला झाला यांनीदेखील त्याच दरम्यान भवरलालजींच्याच प्रेरणेने ‘महाराष्ट्रातील गांधीजी – कालगणना, प्रसंग आणि कृती’ या विषयावर संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली. प्रस्तुत विषय देखील भवरलालजींनी त्यांना सुचवला होता. गुजराथ विद्यापीठात त्यांचे प्रबंध ऑनलाईन पद्धतीने सादर झाले. कोवीडच्या सद्यपरिस्थितीत व्हायवाही ऑनलाईन घेण्यात आला होता.