जळगाव : केंद्र शासनाच्या क्रीडा व युवक सेवा संचालनालय यांच्यावतीने जिल्हा क्रिडा अधिकारी मुंबई यांच्यामार्फत 3 जानेवारी रोजी दुपारी चार वाजेपासुन ऑनलाईन पद्धतीने राज्यस्तरीय युवा महोत्सव – 2020 चे आयोजन करण्यात आले होते. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे लोकनृत्याचे सादरीकरण करण्यात आले.
महाराष्ट्रातून मुंबई, नाशिक, औरंगाबाद, नागपुर, अमरावती, लातुर, पुणे, कोल्हापुर अशा आठ विभागांनी या स्पर्धेत आपला सहभाग यात नोंदवला होता. त्यात भवरलाल अँड कांताबाई जैन फाऊंडेशनला राज्यातून मानाचा प्रथम क्रमांक मिळाला. हा संघ पुढील फेरीसाठी दि 12 जानेवारी रोजी होत असलेल्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवडण्यात आला आहे.
या संघातर्फे लोकनृत्याचा प्रकार करण्यात आला होता. यासोबतच एकपात्री, शास्त्रीय गायन, शास्त्रीय वादन, कथ्थक, बासरी वादन आणि वक्तृत्व अशा विविध स्पर्धादेखील घेण्यात आल्या होत्या. लोकनृत्य प्रकारातील स्पर्धेत जैन फाऊंडेशनच्या सहभागी स्पर्धकांनी प्रतिनिधीत्व सादर केले.
अजय गोसावी, रितीक पाटील, निर्मल राजपुत, हेमंत माळी, योगेंद्र बीसेन, सुमीत भोये, रोहन चव्हाण, मंगेश चौधरी, मोईन शेख आदी सहभागी स्पर्धक कलावंतांचे भवरलाल अँड कांताई जैन फाऊंडेशनचे विश्वस्त तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोकभाऊ जैन यांनी अभिनंदन केले आहे. या स्पर्धेसाठी सौ. रुपाली वाघ यांनी योग्य रितीने समन्वय साधला. त्यांना कला शिक्षक ज्ञानेश्वर सोनवणे व निलेश बारी यांनी योग्य रितीने सहकार्य केले.