पुणे : जमिनीच्या आर्थिक वादातून बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्यावर गोळीबार करुन त्यांची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी मुख्य सुत्रधारासह इतरांसोबत हॉटेलमध्ये बैठक घेणाऱ्या पोलिस हवालदारास निलंबीत करण्यात आले आहे. परमेश्वर तुकाराम सोनके असे निलंबित करण्यात आलेल्या हवालदाराचे नाव आहे. पुणे येथील चंदन नगर पोलिस स्टेशनला सदर हवालदार कार्यरत होता. पोलीस उपायुक्त पंकज देशमुख यांनी त्याच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयानजीक स्टेट बॅंकेच्या प्रवेशद्वाराजवळ 5 ऑक्टोबरला दुपारी पावने तिन वाजेच्या वेळी ही घटना घडली होती. बावधन ब्रुद्रक येथील येथील जमिनीचा निकाल कानाबार यांच्या बाजूने लागणार असल्याचा अंदाज आल्यामुळे आरोपींनी हा गुन्हा केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
बांधकाम व्यावसायिक राजेश कानाबार यांच्या हत्येसाठी राजेश शामलाल साळुंके (38) रा. सुखसागरनगर, कात्रज याने हल्लेखोरांना पिस्तुल व काडतुसे पुरवल्याचे पोलिस तपासात आढळून आले आहे. राजेश साळुंखे व त्याचा साथीदार राकेश रमेश बुरटे (36) रा. जनता वसाहत, पर्वती असे या खुनाचे मुख्य सुत्रधार होते. या दोघांसह सनी अशोक वाघमारे (26), रा. वाघोली, रोहित विजय यादव (19), रा. सुखसागर नगर, कात्रज, गणेश ज्ञानेश्वर (36), राहुल आनंदा कांबळे (36), रुपेश आनंदा कांबळे (38), हसमुख जसवंतभाई पटेल (31) अशांवर याप्रकरणी गुन्हा दाखल होता.
बांधकाम व्यावसायीक राजेश कानाबार यांची हत्या केल्यानंतर गुन्ह्यातील आरोपी राजेश साळुंके, राकेश बुरटे, रोहीत यादव यांच्यासमवेत पोलिस हवालदार परमेश्वर सोनके हा चंदनगर परिसरातील एका हॉटेलात बैठकीस बसल्याचे सीसीटिव्ही फुटेजनुसार उघड झाले आहे. हॉटेल चालकाने देखील तसे कबुल केले आहे. हवालदार सोनके याच्या संपर्कात आरोपी आले होते तरी देखील त्याने पोलिस दलास सहकार्य केले नाही. हवालदार सोनके याने आरोपींना एक प्रकारे मदत केल्याचे आढळून आले. त्याच्या या गैरवर्तनाबद्दल निलंबनाचे आदेश काढण्यात आले आहेत.