जळगाव : अपघाताच्या गुन्ह्यातील संशयीत आरोपीला मदत करण्यासह अपघातग्रस्त वाहन सोडवण्याकामी मोबदला म्हणून 15 हजार रुपयांची लाच घेणे पाळधी दुरक्षेत्रातील पोलिस कर्मचा-यास भोवले. लाच लुचपत विभागाच्या पथकाने त्यास लाच स्विकारतांना रंगेहाथ पकडल्याने पोलिस दलात खळबळ माजली आहे. सुमीत पाटील असे एसीबीच्या जाळ्यात अडकलेल्या पोलिस कर्मचा-याचे नाव आहे.
तक्रारदाराच्या चालकाकडून काही दिवसांपुर्वी अपघात झाला होता. त्या अपघातात एकाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर संबधीत चारचाकी वाहन जप्त करण्यात आले होते. या गुन्ह्यात संशयीताला मदत करण्यासह अपघातग्रस्त वाहन सोडवण्याकामी सुमीत पाटील याने 15 हजाराची लाच तक्रारदाराकडून मागितली होती. तक्रारदाराची लाच देण्याची तयारी नसल्यामुळे त्याने थेट एसीबी कार्यालय गाठून तक्रार दाखल केली होती. या प्रकरणी एसीबी पथकाने योग्य ती पुर्तता केल्यानंतर सापळा रचला. त्या सापळ्यात पोलिस कर्मचारी सुमीत पाटील सापडला. लाचेची रक्कम स्विकारल्यानंतर त्याला एसीबीचे पोलिस उप अधिक्षक गोपाळ ठाकुर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ताब्यात घेत कारवाई केली.