जळगाव : बंद घराचा कडीकोंडा तोडून चोरट्यांनी 35 हजार रुपयांचा एवज लांबवल्याप्रकरणी जळगाव तालुका पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशाल रणजितसिंग पाटील यांच्या घराच्या कपाटातून दहा हजाराची रोकड व दागिने असा एकुण 35 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चोरी झाला आहे. कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात सदर घटना उघडकीस आली आहे.
विशाल पाटील (32) हे कोल्हे हिल्स परिसरातील माऊली नगरात पत्नी व एका मुलीसह राहतात. 7 जानेवारी रोजी ते घराला कुलूप लावून परिवारासह दोंडाईचा येथे गेले होते. सोमवारी रात्री घरी परत आले असता त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडीकोंडा तुटलेला होता. तसेच कपाट देखील उघडेच होते. घरातील एवज तपासला असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.
चोरांनी त्यांच्या घरातील कपाटातून 12 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी, 3 हजार रुपये किमतीची मुलीची सोन्याची अंगठी, 10 हजार रुपये रोख व 5 हजार रुपये किमतीच्या लहान मुलांच्या सोन्याच्या कड्या असा एकुण 33 हजार रुपये किमतीचा एवज लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी जळगाव तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरु आहे.