जळगाव : सुरक्षा रक्षकास गावठी कट्ट्याचा धाक दाखवून तिघा आरोपींनी जळगाव सब जेलच्या मुख्य प्रवेशद्वारातून पलायन केल्याची घटना गेल्या वर्षी घडली होती. बडतर्फ पोलिस कर्मचारी व आरोपी सुशिल मगरे याच्यासह तिघे साथीदार जेलच्या कायदेशीर रखवालीतून पळून गेले होते. यावेळी कर्तव्यावर असलेले कारागृह सुरक्षा रक्षक पंडीत दामु गुंडाळे यांच्या कपाळावर डोक्याला गावठी कट्टा लावण्यात आला होता. तिघा आरोपींनी कारागृह रक्षक गुंडाळे यांच्या खिशातून मुख्य प्रवेशद्वाराला लावलेल्या कुलुपाच्या चाव्या बळजबरी काढून घेतल्या होत्या. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस स्टेशनला रितसर गुन्हा दाखल करण्यात आला होता.
जेलमधून पळून जाणा-या तिघा आरोपींना गावठी कट्टा पुरवणारा त्यांचा साथीदार आनंद उर्फ राहुल गोपाळराव सोनवणे हा पोलिसांना हवा होता. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक किरणकुमार बकाले यांनी आपल्या सहका-यांना आनंद सोनवणे याच्या मागावर पाठवले होते. या पथकात सहायक पोलिस निरिक्षक स्वप्नील नाईक, पो.हे.कॉ. विजयसिंग पाटील, सुनिल दामोदरे, अश्रफ शेख व दत्तात्रय बडगुजर यांचा समावेश होता.
जेलमधील आरोपींना गावठी कट्टा पुरवणारा आनंद सोनवणे हा शिंदखेडा ता. धुळे येथे आला असल्याची गुप्त माहीती पो.नि. किरणकुमार बकाले यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी पथकाला शिंदखेडा येथे रवाना केले. सापळा रचून त्याला शिंदखेडा बस स्थानकावरुन ताब्यात घेण्यात आले. त्याच्या विरुद्ध धुळे जिल्ह्यातील धुळे तालुका पोलिस स्टेशन, शिंदखेडा पोलिस स्टेशन व अमळनेर जिल्हा जळगाव अशा तिन पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल आहेत.