मुंबई: कोरोनामुळे निर्माण झालेल्या संकटकाळात राज्यातील बेरोजगारांना रोजगार मिळण्यासाठी कौशल्य विकास विभागाने पुढाकार घेतला आहे. सध्या सुरु असलेला लॉकडाऊन कालावधी बघता प्रत्यक्ष रोजगार मेळावे घेणे शक्य नाही.
त्यामुळे विभागामार्फत आता ऑनलाईन रोजगार मेळाव्यांचे आयोजन करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी दिली. या मोहीमेंतर्गत आतापर्यंत १४ ऑनलाईन व्हर्च्युअल रोजगार मेळावे झाले आहेत. त्याला उद्योजक व उमेदवारांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. ऑनलाईन मेळाव्यात एकूण ११५ उद्योगांनी त्यांच्याकडे असलेली १२ हजार ३२२ रिक्तपदे अधिसूचित केली आहे.
२५ हजार ४७ उमेदवारांनी ऑनलाईन सहभाग घेतला, त्यापैकी १ हजार २११ उमेदवारांची निवड झाली आहे. इतर उमेदवारांची निवड प्रक्रिया सुरु असल्याची माहिती मंत्री मलिक यांनी दिली.
कौशल्य विकास विभागाने www.mahaswayam.gov.in या संकेतस्थळाचा पवापर करून हे मेळावे घेतले. पुणे, सातारा, औरंगाबाद, नागपूर, सांगली, ठाणे येथील जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन कार्यालयांनी प्रत्येकी एक ऑनलाईन रोजगार मेळावा घेतला.
नाशिक आणि यवतमाळ येथील कार्यालयांनी प्रत्येकी दोन तर उस्मानाबाद मॉडेल करिअर सेंटर यांनी चार ऑनलाईन रोजगार मेळावे आयोजित केले.