जळगाव जिल्ह्यात सात केंद्रावर होणार कोविड लसीकरण

जिल्हाधिकारी अभिजित राउत

जळगाव : जळगाव जिल्ह्यात शनिवार 16 जानेवारी पासून सात केंद्रावर कोविड -19 लसीकरण मोहिमेस सुरवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक केंद्रावर 100 याप्रमाणे एकूण 700 आरोग्य अधिकारी, कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल. यासाठी आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

सदर पत्रकार परिषदेस जळगाव शहर मनपाचे आयुक्त सतीश कुलकर्णी, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ जयप्रकाश रामानंद, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जमादार, निवासी उपजिल्हाधिकारी राहूल पाटील तसेच आयएमएचे प्रतिनिधी, आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी हजर होते.

जिल्ह्यात कोविड-19 लसीकरण मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय जळगाव, म.न.पा अंतर्गत डी.बी.जैन हॉस्पीटल, उपजिल्हा रुग्णालय, चोपडा आणि जामनेर तसेच ग्रामीण रुग्णालय, पारोळा व चाळीसगाव आणि न. पा. भुसावळ अशी सात केंद्रे लसीकरणासाठी राहणार आहेत. या मोहिमेसाठी प्रति लसीकरण केंद्र 100 लाभार्थी याप्रमाणे सातशे आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांना ही लस दिली जाईल. या मोहिमेसाठी जिल्ह्यात एकूण 19 हजार 951 आरोग्य अधिकारी व कर्मचाऱ्यांची नोंद झाली आहे. त्यासाठी ‘कोविशील्ड’ या लसीचे 24 हजार 320 डोस प्राप्त झाले आहेत.

राष्ट्रीयस्तरावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते कोविड-19 लसीकरण मोहिमेचे उदघाटन होईल. त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव येथे मान्यवरांच्या उपस्थितीत या लसीकरण मोहिमेचा प्रारंभ होईल. लसीकरणाची वेळ सकाळी 9 ते सायंकाळी 5 अशी राहील. लाभार्थींना शक्यतोवर लस दंडावर दिली जाईल. त्यानुसार वस्त्र परिधान करावे. व्हॅक्सीनेशन ऑफिसर 2 हा आलेल्या लाभार्थ्यांचे ओळखपत्राची तपासणी करेल. लस घेतल्यावर काही त्रास जाणवल्यास आरोग्य केंद्र/कोरोना कंट्रोल रुम 0257-2226611 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here