जळगाव : जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे कोरोनाच्या लसीकरणानंतर उपजिल्हा रुग्णालयातील परिचारिका आशा तायडे यांना सौम्य स्वरुपाची रिॲक्शन झाली. तशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. राजेश सोनवणे यांनी दिली आहे. लस घेतल्यानंतर तायडे यांच्या घशाला कोरड पडली होती. त्यांना कोरडा खोकला येत असल्याचे दिसून आल्यामुळे त्यांच्यावर वेळीच औषधोपचार करण्यात आले. अर्ध्या – पाऊन तासानंतर त्यांना घरी पाठविण्यात आले.
कोरोना लसीकरण अभियानाला देशभरात शनिवार पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात तीन करोड जणांना ही कोरोना लस दिली जाणार आहे. कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली असली तरी लसींबाबत काही प्रश्नचिन्ह निर्माण केले जात आहेत. या पार्श्वभूमीवर भारत बायोटेकने घोषणा केली आहे. कोरोना लसीचा दुष्परिणाम आढळून आल्यास त्याची नुकसानभरपाई संबंधीतास दिली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे.
केंद्र सरकारकडून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिन कोरोना लसीचे 55 लाख डोस खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. लस दिल्या जाणाऱ्या लाभार्थ्याला एका सहमती पत्रावर स्वाक्षरी करायची आहे. कोरोना लसीचे दुष्परिणाम दिसल्यास गंभीर स्थितीतील लाभार्थ्यास नुकसानभरपाई देण्यात येईल असे कंपनीकडून सांगण्यात आले आहे.
लसीबाबत काही तक्रार उद्भवल्यास त्यावर सरकारी रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील. कोव्हॅक्सिन कोरोना लसीमुळेच लाभार्थ्याला आरोग्याची समस्या उद्भवली असल्याचे सिद्ध झाले पाहिजे असेदेखील कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले आहे.