नाशिक : भक्ष शोधत असतांना रविवारच्या रात्री नाशिक – नांदुरमध्यमेश्वर भागातील गोदावरी नदीच्या पात्रालगत गाळामध्ये बिबट्याची नर – मादी जोडी अडकून अडकून फसली. नाका-तोंडात पाणी गेल्यामुळे दुर्दैवाने दोन बिबट्यांचा बळी गेला. सदर घटना आज सोमवारी (18 जानेवारी) उघडकीस आली. मृत्युमुखी पडलेल्या दोघा बिबट्यांमध्ये दीड वर्षाचा नर व चार वर्षाची मादी आहे.
निफाड तालुक्यातील नांदुरमध्यमेश्वर नजीक गोदावरी नदीच्या पुलाजवळ असलेल्या नदीपात्रालगत मोठ्या प्रमाणात गाळ साचला आहे. या ठिकाणी रात्रीच्या अंधारात भक्ष्य शोधत आलेले नर-मादी बिबट्या गाळामध्ये अडकून पडले. या गाळातून दोघांना बाहेर पडता आले नाही. गाळातून बाहेर पडण्याचा या बिबट्याच्या जोडीने कसोशीने प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही. नाका-तोंडात पाणी जाऊन या नर-मादी बिबट्यांचा मृत्यु झाल्याचे सहायक वनसंरक्षक डॉ. सुजीत नेवसे यांनी म्हटले आहे.