परस्त्रीचा नाद, त्यात दिड एकर शेतीचा वाद ! बाप नव्हे साप, गळा दाबून मुलास करतो बाद !!

नाशिक : ब-यापैकी धनसंपदा जवळ आली म्हणजे अनेकांना वेगवेगळी बुद्धी सुचते. बुद्धीच्या कुवतीनुसार प्रत्येक जण आपल्या धनसंपदेचा वापर करत असतो. एखाद्या अल्पशिक्षीत व्यसनी व्यक्तीजवळ एखाद्या दिवशी जास्त पैसे आले म्हणजे त्याचे पाय ब-याचदा दारुच्या दुकानाकडे वळतात. एखाद्या उच्च शिक्षीत व्यक्तीकडे ब-यापैकी धनसंपदा आली तर तो त्याचा योग्य रितीने विनीयोग करतो.  

प्रभाकर नामदेव माळवाड हे पशु वैद्यकीय अधिकारी म्हणून सरकारी सेवेत रुजू झाले. नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या ते सेवेत होते. सरकारी सेवेत आल्यानंतर साहजीकच त्यांना ब-यापैकी धनसंपदा लाभली. त्यापाठोपाठ समाजात मानसन्मान देखील लाभला. त्या बळावर त्यांचा सन 1985 मधे विवाह झाला. त्यांचे वैवाहीक जिवन सुरळीत सुरु होते.

धनसंपदा खुळखुळत असल्यामुळे त्यांचा पाय हळूहळू घसरु लागला. लग्नानंतर तिन वर्षांनी सन 1988 मधे ते एका महिलेच्या प्रेमात पडले. फक्त प्रेमातच पडले नाही तर त्यांनी तिच्यासोबत विवाहबाह्य देखील संबंध प्रस्थापीत केले. घरवाली व बाहरवाली असे त्यांचे दोन युनीट सुरु झाले. लग्नाची हक्काची अधिकृत पत्नी असतांना देखील त्यांनी खासगी स्वरुपात दुसरा घरोबा निर्माण केला. हळूहळू प्रभाकर माळवाड यांचा पाय जास्तच घसरु लागला. ते दुस-या युनीटकडे अर्थात त्या महिलेच्या प्रेमसंबंधात जास्त लक्ष घालू लागले. त्यातून कालांतराने त्यांना दोन अपत्य झाली.

पहिल्या पत्नीपासून त्यांना दोन मुली व एक मुलगा अशी तिने अपत्ये झाली होती. कालांतराने त्यांच्या दोन्ही मुलींची लग्ने झाली व त्या सुखाने नांदण्यास सासरी गेल्या. त्यांचा मुलगा काळानुरुप मोठा झाला. त्याला आपल्या वडीलांचे कारनामे समजू लागले. आपल्या पित्याचे त्या महिलेसोबत असलेले प्रेमसंबंध त्याला अजिबात आवडत नव्हते. त्यातून घरात तो चिडचिड करत होता. मात्र प्रभाकर माळवाड हे दोन्ही युनीटकडे लक्ष घालत होते.

प्रभाकर  माळवाड यांनी आपल्या नावावर असलेली दिड एकर शेती त्या महिलेच्या नावावर केल्याचे त्यांचा मुलगा निलेश यास समजले. त्यामुळे तो घरात वडील प्रभाकर माळवाड यांच्यावर जास्तच चिडचिड करु लागला. दोन्ही बाप बेट्यामधे सुरु असलेल्या भानगडीमुळे घरातील वातावरण दुषित होण्यास वेळ लागत नव्हता. तु माझ्या व तिच्या अर्थात त्या महिलेच्या आड येवू नकोस. तु आमच्यामधे आला तर तुला बघूनच घेईन अशी धमकी प्रभाकर माळवाड मुलगा निलेश यास देऊ लागले. त्या महिलेमुळे घरातील वातावरण दुषीत होत असले तरी देखील प्रभाकर माळवाड तिचा नाद सोडण्यास तयार नव्हते. त्यामुळे निलेश त्याच्या आईकडे त्याचे गा-हाणे घेवून जात होता.

दिड एकर शेती प्रभाकर माळवाड यांनी त्या महिलेच्या नावावर केली आणि वादाला सुरुवात झाली होती. बाप बेट्यामधील वादाचा शेती हा मुख्य विषय होता. मी तुला बघूनच घेईन ही धमकी बापाकडून निलेशला नेहमीच मिळत होती. निलेश त्याच्या आईकडे त्याचे गा-हाणे मांडत असला तरी ती माऊली बिचारी नव-याला समजावण्याचा प्रयत्न करत होती. मात्र घरचा धनी असलेल्या प्रभाकरच्या  मनी ती महिला ठाण मांडून बसली होती.

निलेश सध्या बेरोजगार होता. या दुनियेत कामधंदा शोधणे हे देखील एकप्रकारे कामच असते. त्यामुळे तो कामधंदा शोधण्याचे काम करत होता. मुलगा निलेशने त्या महिलेचा व तिला दिलेल्या दिड एकर शेतीचा वाद सुरु केला म्हणजे बाप प्रभाकर त्याला तु काहीच कामधंदा करत नाही असा विषय उकरुन काढत होते. दोन्ही जण आपापले वादाचे विषय सोबतच बाळगत होते. दोघांचेही प्रश्न सध्याच्या घडीला सुटण्यासारखे नव्हते. दोघांचे विषय बातम्यांप्रमाणे “चर्चाका विषय” बनून राहिले होते.

तु काहीच कामधंदा करत नाहीस, तु आमच्यावर ओझे आहे असा सुर प्रभाकर माळवाड यांच्याकडून आवळण्यास सुरुवात झाली म्हणजे मुलगा निलेश त्यांना त्या महिलेस दिलेल्या दिड एकर शेतीचा विषय बाहेर काढत असे. ती शेती आमची आहे असे निलेशने म्हणताच बाप प्रभाकर जाम चिडायचा. तु त्या शेतात पायच ठेवून दाखव तुला दाखवतोच, तुला संपवतोच असा दम निलेशला त्याच्या पिताश्रीकडून मिळत होता. आपल्या विवाहबाह्य संबंधावर आक्षेप घेणारा व शेतीत हिस्सा मागणा-या निलेशबद्दल कायमचा तोडगा काढण्याचा विचार प्रभाकर माळवाड यांच्या मनात सुरु झाला होता. जन्मदाता बापच मुलाच्या जिवावर उठण्याची तयारी करण्यास सरसावला होता.

3 जानेवारी सुटीचा दिवस उजाडला. रवीवार असल्यामुळे तिघे जण घरातच होते. नेहमीप्रमाणे निलेशने विषयाला सुरुवात केली. आपल्या शेतात मला पोल्ट्री फार्म टाकून द्या अशी फर्माईश निलेशने त्याचे वडील प्रभाकर माळवाड यांचेकडे केली. मुलाची मागणी ऐकताच बाप प्रभाकर माळवाड यांच्या संतापात भर पडली. “तु काहीच कामाचा नाहीस, मी तुला काहीच करु देणार नाही” असे म्हणत त्यांनी वादात भर टाकली. सुटीचा दिवस देखील असाच वादात गेला. दिवसभर दोघा बाप बेट्यातील वाद शमण्याची चिन्हे दिसत नव्हती. शेवटी प्रभाकर माळवाड यांच्या पत्नीने बाप बेट्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर कसेबसे दोघे जण शांत झाले. मात्र तुझा एके दिवशी गेमच करतो ही धमकी देण्यास बापाच्या रुपातील प्रभाकर माळवाड विसरले नाही.

प्रभाकर माळवाड यांच्या मनातील राग झोपेत देखील तसाच कायम होता. आपल्या विवाहबाह्य संबंधाला आक्षेप घेतो, शेतात हिस्सा मागतो या दोन मुद्द्यावर प्रभाकर माळवाड यांना मुलाविषयी राग होता. आता त्याला सोडायचेच नाही, त्याला संपवूनच टाकायचे असे मनाशी म्हणत त्यांनी रात्री झोपण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना झोप लागत नव्हती. सकाळी भल्या पहाटे उठून प्रभाकर माळवाड यांनी निलेशचा अंदाज घेतला. चोरपावलांनी त्यांनी निलेशच्या बेडरुममधे प्रवेश केला. निलेश त्यावेळी सकाळच्या साखरझोपेत होता. त्याला बघताच प्रभाकर माळवाड यांचा संताप अनावर झाला. निलेशच्या छातीवर बसून त्यांनी त्याचा गळा आवळण्यास सुरुवात केली. तुला आज संपवूनच टाकतो असे म्हणत त्यांनी त्याचा गळा जोरात आवळला.  

आपला बाप आपल्या छातीवर बसून आपला गळा आवळत असल्याचे बघून निलेश घाबरला. त्याने आपली सुटका करण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र त्याची सुटका होणे अशक्य दिसताच त्याने त्याच्या आईला हाका मारण्यास सुरुवात केली. मुलाच आक्रोश ऐकून त्याची आई धावतच त्याच्या बेडरुममधे आली. समोरचे दृश्य बघुन तिला देखील निलेशप्रमाणे दरदरुन घाम फुटला. तिने मुलाची सुटका करण्यासाठी पुरेपुर प्रयत्न केला. मात्र प्रभाकर माळवाड यांनी तिला ढकलून देत निलेशचा गळा जोरात आवळला. आज तुला संपवूनच टाकतो असे म्हणत जिव जाईपर्यंत त्यांनी निलेशचा गळा आवळला. त्यात निलेश जागीच ठार झाला.

एका बापाने खुद्द आपल्या मुलाला ठार केले होते. मुलास ठार केल्यानंतरच यमरुपी बाप प्रभाकर त्याच्या छातीवरुन उठला. त्यानंतर निलेशची आई त्याच्याजवळ गेली. तिने त्याला उठवण्याचा पुरेपुर प्रयत्न केला. मात्र यमरुपी बापाच्या हातून तो केव्हाच देवाघरी गेला होता. मुलगा अजिबात हालचाल करत नसल्याचे बघून तिने जोरजोरात आक्रोश करण्यास सुरुवात केली. तेवढ्या वेळात प्रभाकरने निलेशच्या गळ्याला बेडशीटचा फास दिला. निलेशने स्वत:च गळफास घेवून आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण करण्याचा प्रभाकरने प्रयत्न केला.

निलेशच्या आईचा आक्रोश ऐकून शेजारी राहणारे जमा झाले व त्यांनी घरात धाव घेतली. त्यांना सर्व  प्रकार लक्षात येण्यास वेळ लागला नाही. या घटनेबाबत मुंबई नाका पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे व त्यांच्या सहका-यांनी घटनास्थळी धाव घेतली. प्रभाकर माळवाड यास ताब्यात घेण्यात आले. पुढील कायदेशीर सोपास्कर पार पाडण्यात आले.

जयश्री प्रभाकर माळवाड यांनी दिलेल्या खबरीनुसार मुंबई नाका पोलिस स्टेशनला खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 1/20 भा.द.वि. 302 नुसार दाखल करण्यात आला. पोलिसांनी प्रभाकर नामदेव माळवाड यास अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास मुंबई नाका पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक किशोर मोरे व त्यांचे सहकारी  करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here