बुलडाणा: ब्युटी पार्लर सुरू करण्याच्या निमीत्ताने देऊळगाव राजातील एका व्यक्तीसोबत संपर्क वाढवून त्याच्याकडून 25 लाख रुपयांची खंडणी उकळण्याच्या प्रयत्नात असलेल्या महिलेसह तिच्या दोघा साथीदारांना बुलढाणा स्थानिक गुन्हे शखेच्या पथकाने रेड हॅंड पकडले. काल झालेल्या या कारवाईत पोलिसांच्या ताब्यातील तिघांना तिन दिवसांची पोलिस कोठडी न्यायालयाने सुनावली आहे.
देऊळगाव राजा तालुक्यातील भीवगाव येथील राहूल सर्जेराव गाडेकर, रोहीणी नितीन पवार (२९) , सचिन दिलीप बोरडे या दोघांसह महिलेला अटक करण्यात आली आहे. यांच्याकडून चार लाख रुपये रोख, मोबाईल व अन्य साहित्य जप्त करण्यात आले आहे.
ओळख झालेल्या व्यक्तीसोबत या प्रकरणातील महिलेने व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत मागीतली होती. ते एकमेकांचे घनिष्ठ मित्र झाले होते. त्यांच्या भेटीचे चित्रीकरण तिच्या दोघा साथीदारांनी केले होते. चित्रीकरणाच्या आधारे दोघा साथीदारांनी 25 लाखाची खंडणी मागण्यास सुरुवात केली होती. खंडणी दिली नाही तर महिलेचा वापर करुन खोटी बलात्काराची तक्रार व अॅट्रॉसीटीचा गुन्हा दाखल करण्याची व ते चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी तक्रारदारास देण्यात आली होती.
जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. दिलीप पाटील भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक महेंद्र देशमुख व त्यांच्या सहका-यांनी तक्रारदाराकडून चार लाख रुपयांची रोकड घेतांना तिघांना रंगेहाथ पकडले.