राष्ट्रीय डॉक्टर दिनानिमित्त पत्राद्वारे दिल्या शुभेच्छा
मुंबई: कोरोना विषाणू सोबत लढा देणाऱ्या राज्यातील डॉक्टर योद्ध्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आभार मानले आहे. राष्ट्रीय डॉक्टर दिनाचे औचित्य साधून त्यांनी डॉक्टरांचे विशेष आभार मानत त्यांच्या सेवा आणि समर्पणाला सलाम केला आहे.
भारतरत्न डॉ. बी. सी. रॉय यांच्या जन्मदिनानिमित्त राष्ट्रीय डॉक्टर दिन म्हणून साजरा केला जातो. राष्ट्रीय डॉक्टर दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी डॉक्टर्संना उद्देशून पत्राद्वारे संदेश दिला आहे. कोविड युद्धातील डॉक्टर्संना मुख्यमंत्री महोदयांचे पत्र ई-मेल आणि विविध माध्यमातून पाठविण्यात आले आहे.
पत्रात मुख्यमंत्री म्हणतात की डॉक्टर्स दिन आपण दरवर्षी साजरा करतो. मात्र यंदाची ही परिस्थिती अभूतपुर्व आणि कसोटीची आहे. कोरोना विषाणूच्या विरोधात आपण सर्वांनी युद्ध पुकारले आहे. या युद्धाच्या आघाडीवर तुम्ही बिनीचे शिलेदार आहात.
रुग्ण सेवेतून कोरोना विरोधात लढत आहात. सेवा बजावत असताना कुटुंबीय, प्रियजनांपासून कित्येक दिवस दूर रहात आहात. इतरांच्या कुटुंबातील प्रियजन कोरोनाने हिरावले जाऊ नयेत त्यासाठी अहोरात्र मेहनत घेत आहात. त्यामुळे कित्येकांसाठी तुम्ही देवदूत आहात. तुमचे योगदान येणाऱ्या कित्येक पिढ्या विसरणार नाहीत. आपण कोरोना विषाणुला हरवल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास आहे.
या समर्पणामागे तुमच्या कुटुंबाचाही मोठा त्याग आहे. त्यासाठी महाराष्ट्र आपला कृतज्ञच राहील. या कठीण काळात सेवावृत्तीने बजाविलेल्या कर्तव्याची समृद्ध महाराष्ट्राच्या सोनेरी पानावर निश्चितच नोंद घेण्यात येईल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.