जळगाव : मजुरी करणा-या अल्तमश शेख यास दारु पिण्याचे व्यसन होते. मेहनती काम करुन घरी परतल्यावर त्याला दारुचे घोट लागत होते. दारुचे घोट घेतल्याशिवाय त्याची सायंकाळ सुखाची जात नव्हती. मोलमजुरी करणा-या अल्तमशचे टोपणनाव सत्त्या होते. जळगावच्या शाहू नगर भागातील रहिवासी अल्तमश हा सत्त्या या टोपणनावाने परिसरातील लोकांना परिचीत होता. सत्त्याचे दारु पिण्याचे व्यसन परिसरातील लोकांना माहिती होते.
सत्त्या रहात असलेल्या परिसरात अझरुद्दीन शेख हा तरुण रहात होता. अझरुद्दीन हा भुत फलीत या टोपणनावाने परिसरात परिचीत होता. भुत फलीत याला देखील दारु पिण्याचे व्यसन होते. उनाडक्या करणे हा भुत फलीत याचा उद्योग होता. डोक्यावरील मोठी जुल्फे त्याने सोनेरी व रुपेरी केली होती. त्याची सोनेरी जुल्फे आणि भुत फलीत हे टोपणनाव हीच त्याची ओळख होती. त्याचा चेहरा, सोनेरी जुल्फे, मानेला झटका देवून जुल्फे सावरण्याची लकब आणि टोपणनाव तसेच शर्टाची वरील दोन उघडी बटने बघता तो गुन्हेगारी वृत्तीचा असल्याचे सहज लक्षात येत होते.
वाळलेले झाड ताठ उभे असते आणि पानाफुलांनी भरलेले झाड नेहमी झुकलेले असते. या निसर्ग नियमानुसार खिशात दमडी नसली तरी दारु पिऊन वाळलेल्या ताठ झाडाप्रमाणे रुबाब करणारा एक तरुणवर्ग तळागाळातील समाजात वावरत असतो. त्याला भुत फलीत आणि सत्त्या हे दोन्ही तरुण अपवाद नव्हते. दोघांच्या अंगात रग होती. आपल्या मनाविरुद्ध कुणी वागले, कुणी प्रतीप्रश्न केला अथवा प्रतीउत्तर दिले म्हणजे दोघांची मस्ती उफाळून येत होती.
24 जानेवारी रोजी सायंकाळी सत्त्या घरातून बाहेर पडला. तो रहात असलेल्या घरापासून जवळच रेल्वे लाईनजवळ एक जागा होती. त्या जागेला जळकी मिल असे म्हटले जाते. त्या जळकी मिलजवळ पडलेल्या खुर्चीवर बसून सत्या दारु पित बसला. त्याचवेळी भुतफलीत तेथे आला.
साहेबी थाटात खुर्चीवर बसून दारु पिणा-या सत्त्याला बघून भुताचे टाळके सटकले. त्याने देखील सत्त्याला सिनेमातील व्हिलनप्रमाणे “तु येथे काय करतो आहे रे…….. “ असे दरडावून विचारले. त्यावर सत्त्याने “तुला काय करायचे रे………” असे फिल्मी हिरोप्रमाणे निडरप्रमाणे उत्तर दिले.
आपल्याला प्रतीउत्तर दिल्याचे ऐकून भुताचा इगो दुखावला. त्याला सत्त्याचा राग आला. त्याने सत्त्याला दोन खडे बोल सुनावले. त्यामुळे आधीच नशेत असलेल्या सत्त्याला देखील राग आला. त्याने देखील भुताला शाब्दिक मार दिला. दोघांचा शब्दामागे शब्द वाढत होता. मुद्द्याची गोष्ट आता गुद्द्यावर येण्यास वेळ लागला नाही. जवळच एक लोखंडी पाईप पडलेला होता. भुताने तो लोखंडी पाईप उचलून सत्त्याच्या छातीत व पोटावर मारण्यास सुरुवात केली. याशिवाय जवळच पडलेला एक दगड उचलून त्याने सत्त्याच्या दिशेने भिरकावला. या मारहाणीत सत्त्याच्या कानाजवळून रक्त वाहू लागले व तो जमीनीवर कोसळला. काही क्षणातच तो गत:प्राण झाला. रागावरील नियंत्रण सुटल्यामुळे संतापच्या भरात भुताकडून सत्याचे मरण झाले.
हा वादावादीचा आणि मारहाणीचा प्रकार जवळच असलेल्या जळकी मिलमधे असलेल्या झाडूच्या गोडावूनचा वाचमन बघत होता. त्याने पळत जावून हा प्रकार मरण पावलेल्या सत्त्याच्या घरी जावून सांगितला. माहीती मिळताच सत्त्याचे काका अकील व शकील हे दोघे भाऊ नातेवाईकांसह घटनास्थळी आले. दरम्यानच्या कालावधीत भुत तेथून गायब झालेला होता. सत्त्या मात्र निपचीप पडलेला होता. जवळच असलेल्या टेंट हाऊसमधील दोघा कर्मचा-यांनी अकिल व शकील या दोघा भावांना हकिकत कथन केली. सोनेरी केस अर्थात जुल्फे असलेल्या तरुणासोबत सत्त्याचा वाद झाला होता व त्या वादातून त्याने सत्त्याला मारहाण केल्याचे अकील व शकील यांना समजले. दोघा भावांनी पुतण्या सत्त्या यास रिक्षाने एका खासगी दवाखान्यात नेले. तेथील डॉक्टरांनी त्याला बघून तो मयत झाला असल्याचे सांगितले. त्यामुळे त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले.दरम्यान सत्त्या खरोखरच मरण पावला का याबाबत पसार झालेल्या भुताने दवाखान्यातून माहिती घेतली. आपल्या मारहाणीमुळे सत्त्या मरण पावल्याचे समजल्यानंतर तो शहरातील उस्मानीया पार्क भागात पळून गेला.
या प्रकरणी मयत सत्त्याचे काका शेख अकील यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार जळगाव शहर पोलिस स्टेशनला अझरुद्दीन उर्फ भुतफलीत याच्या विरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 18/21 भा.द.वि.302 नुसार दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिक्षक डॉ.प्रविण मुंढे, अप्पर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा तसेच पो.नि. धनंजय येरुळे यांनी आपल्या सहका-यांसह घटनास्थळी भेट देत घटनेची सत्यता पडताळून पाहिली. दरम्यान वरिष्ठांच्या आदेशाने गुन्हे शोध पथकातील सहायक फौजदार वासुदेव सोनवणे, विजय निकुभ. उमेश भाडारकर, प्रफुल्ल धांडे,अक्रम शेख, गणेश पाटील, भास्कर ठाकरे, दीपक सोनवणे, रतन गीते. तेजस मराठे, राजकुमार चव्हाण, प्रणेश ठाकुर,योगेश इंधाटे, ओमप्रकाश पंचलिंग आदींचे पथक फरार अझरुद्दीन उर्फ भुत फलीत याच्या शोधार्थ रवाना झाले होते.
फरार अझरुद्दीन उर्फ भुत फलीत शेख हा शहरातील उस्मानीया पार्क भागात लपून बसला असल्याची माहीती पथकाला समजताच त्याला शोधून पो.नि. धनंजय येरुळे यांच्या समक्ष हजर करण्यात आले. त्याने आपला गुन्हा कबुल केला. रागाच्या भरात आपण हे कृत्य केल्याचे त्याने कबुल केले. सत्त्या यास जिवे मारण्याचा आपला हेतू नव्हता असे देखील भुताने कबुल केले. अटकेतील अझरुद्दीन उर्फ भुत फलीत शेख यास न्यायालयात हजर केले असता सुरुवातीला न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली.