गांधी रिसर्च फाउंडेशनतर्फे चित्रप्रदर्शन व डॉक्युमेंटरी

जळगाव : गांधी रिसर्च फाउंडेशन गांधीतीर्थच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या 73 व्या पुण्यतिथीचे औचित्य साधून महात्मा गांधी उद्यानात शरद डोंगरे यांच्या हस्ते ‘भावांजली’ कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. दीपप्रज्वलनासह महात्मा गांधी प्रतिमा पूजनाने या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. यावेळी उदय महाजन, मनोहर बागुल, विजय मोहरीर, अनिल जोशी, नितीन चोपडा, बी.डी. पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

‘महात्मा को नमन’ या प्रदर्शनात प्रामुख्याने महात्मा गांधीजींच्या अंतिम यात्रेच्या ऐतिहासिक घटनेवर आधारीत अधिकृत संदर्भ असलेले गांधी रिसर्च फाउंडेशनचे विशेष चित्र प्रदर्शन आहे. हे प्रदर्शन उद्यानाच्या वेळात नागरिकांना पुढील तीन दिवस विनामूल्य बघता येणार आहे.

कार्यक्रमाच्या औपचारिक उद्घाटनानंतर सायंकाळी साडेसहा ते रात्री नऊ दरम्यान् गांधीजींची अंतिम झलक आणि विश्वातील प्रसिद्ध व्यक्तींनी महात्माजींना दिलेली श्रद्धांजली अशी हिंदी व इंग्रजीची ‘द लास्ट जर्नी’ डॉक्युमेंटरीचे सहा शो देखील दाखवण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला 5 वाजून 17 मिनिटांनी उभे राहून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजी डिप्लोमाच्या विद्यार्थ्यांनी ‘वैष्णव जन तो…’ व ‘दे दी हमे आझादी बिना खडग बिना ढाल…’ हे गीत गायन केले. कार्यक्रमास शहरातील नागरिक व विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्विन झाला यांनी केले. गांधी रिसर्च फाउंडेशन गांधी तीर्थ आणि जैन इरिगेशनच्यावतीने महात्मा गांधीजींच्या 73 व्या पुण्यतिथी निमित्त 30 जानेवारी रोजी सकाळी 11 वाजता व सायंकाळी 5.17 वाजता महात्मा गांधींना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

जैन इरिगेशनचे संपूर्ण भारतातील, कारखाने, कार्यालये, डेपो यात मुख्यत्वाने जैन प्लास्टिक पार्क, जैन टिश्यूकल्चर टाकरखेडा, जैन हिल्स, जैन फूड पार्क, जैन एनर्जी पार्क, कांताई नेत्रालय कांताई सभागृह, अनुभूती रेसिडेंशियल स्कुल, अनुभूती इंग्लिश मिडीयम स्कुल, वाकोद फार्म, गौरबाई कृषी तंत्रनिकेतन आदी आस्थापनांमध्ये सहकाऱ्यांनी सकाळी 11 वाजता आणि सायंकाळी 5 वाजून 17 मिनिटांनी दोन मिनिटे मौन पाळले व उभे राहून श्रद्धांजली अर्पण केली. सकाळी श्रध्दांजलीच्या वेळी जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व सहकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here