जळगाव : कोरोनाची साथ, लॉकडाऊन मुळे आर्थिक अडचणीत सामान्य माणूस सापडला आहे महामारीच्या महासंकटामुळे अडकलेले अर्थचक्र पूर्ववत गतिमान करण्यासाठी हा अर्थसंकल्प मला महत्त्वाचा वाटतो. आयकर रचनेत कोणताच बदल न करता सामान्य नागरीकाला आणि शेतकऱ्यांसाठी काही मोलाच्या तरतुदी या अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या आहेत. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजना व जल जीवन मिशन या महत्वाकांक्षी योजना ठरतील, अशी प्रतिक्रिया जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांनी आपली प्रतिक्रिया नोंदविली.
शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला दुप्पट करण्याचा याही वर्षाच्या अर्थसंकल्पात संकल्प केलेला आहे. या वर्षाच्या अंदाजपत्रकात ग्रामीण व कृषिक्षेत्रासाठी एकूण 16.5 लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शेतकऱ्यांच्या हमीभावाच्या दीड पट भाव देणे, कृषी कर्जासाठी 17.5 लाख कोटी रुपयांची तरतूद, सूक्ष्मसिंचनासाठी केंद्र सरकार तर्फे नाबार्ड मार्फत राज्यांसाठी 10 हजार कोटी रुपयांची तसेच लहान सिंचन प्रकल्पांसाठी 5 हजार कोटी रुपयांची तरतूद, देशात येत्या तीन वर्षात 7 नवीन टेक्स् टाईल पार्क उभारणे, गहू, तांदूळ, कापूस आणि दाळी उत्पादनासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळणार आहे. या अंदाजपत्रकात सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की, प्रधानमंत्री कृषी सिंचाई (ठिबक सिंचन) योजना साठी 4000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आहे.
जल जीवन मिशन ही महत्वाकांक्षी योजना सुद्धा राबविण्यात येणार आहे. त्याअंतर्गत येत्या ५ वर्षांसाठी शहर असो किंवा छोटं खेडं असो प्रत्येकाला घराघरात नळद्वारे पाणी पोहोचण्यासाठी 287 लाख कोटी रुपयांचा निधी राखीव असेल. आज 1 फेब्रुवारी 2021 रोजी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी आपला तिसरा अर्थसंकल्प सादर केला. हा पहिला पेपरलेस अर्थसंकल्प हे प्रमुख वैशिष्ट्य म्हणता येईल.