मुंबई : आयआयसीआय बँकेच्या माजी मुख्य कार्यकारी अधिकारी चंदा कोचर यांना आयसीआयसीआय बॅंक – व्हिडीओकॉन मनी लाँड्रिंग प्रकरणी 5 लाख रुपयांचा जामीन मंजुर करण्यात आला आहे. या घोटाळ्यातील सुनावणीच्या वेळी त्या मुंबईच्या विशेष पीएमएल न्यायालयात हजर होत्या.
विशेष न्यायाधीश ए.ए. नांदगावकर यांच्या समक्ष चंदा कोचर यांच्या वतीने अॅड. विजय अग्रवाल यांनी जामीनअर्ज सादर केला. त्यावर न्यायालयाने ईडीला जामीन अर्जावर उत्तर देण्यास सांगितले. तसेच चंदा कोचर यांचा पाच लाख रुपयांचा जातमुचलक्यावरील जामीन मंजुर केला. मात्र परवानगीशिवाय देश सोडून जाता येणार नसल्याचे देखील न्यायालयाने चंदा कोचर यांना बजावले आहे.
ईडीने 30 जानेवारी रोजी पीएमएलए च्या विशेष न्यायालयाने चंदा कोचर, त्यांचे पती दीपक कोचर, व्हिडीओकॉनचे समुह प्रवर्तक वेणूगोपाल धूत व इतर आरोपीतांना समन्स बजावले होते. चंदा कोचर यांच्या अख्त्यारीत आयआयसीआय बॅंकेच्या समीतीने व्हीडीओकॉन इंटरनॅशनल इलेक्ट्रॉनिक्स लिमीटेडला तिनशे कोटी रुपयांचे कर्ज मंजुर केले होते. तसेच व्हिडीओकॉन इंडस्ट्रीजने चंदा कोचर यांचे पती दीपक कोचर यांच्या मालकीच्या एनआरपीएल या कंपनीस 64 कोटी रुपये दिल्याचा ईडीचा आरोप आहे.