जळगाव : आज 14 फेब्रुवारी रोजी भल्या पहाटे शहरालगत खेडी परिसरात चोरट्यांनी एका वृद्ध दाम्पत्यासह त्यांच्या बारा वर्षाच्या नातवाला बेदम मारहाण करत कपाटातून् रोख रकमेसह दागिन्यांचा लाखो रुपयांचा ऐवज लंपास केला. या घटनेमुळे खेडी परिसरात दहशत निर्माण झाली आहे.
आज भल्या पहाटे सुमारे साडेतीन वाजेच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. या घरातून लाखो रुपयांचा एवज घेवून पोबारा करण्यापुर्वी या लुटारुंनी यमुना नगर भागातील विजय सुकदेव चव्हाण यांच्या घरातील सुटकेस देखील पळवून नेल्याचे समजते.
नंदुरबार पोलिस दलातील कर्मचारी योगेश जगन्नाथ भोळे यांचे खेडी परिसरात श्रीकृष्ण मंदिरानजीक दोन मजली घर आहे. घरात त्यांची आई सुशिलाबाई व वडील जगन्नाथ भोळे तसेच मोठ्या भावाची पत्नी व मुलगा असे राहतात. त्यांच्याकडे त्यांचा भाचा सिद्धांत दांडगे आलेला होता. एकाच खोलीत हे दाम्पत्य आणि सिद्धांत असे तिघे जण झोपलेले होते. पहाटे अडीच ते तिन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दाराची कडी तोडून आत प्रवेश मिळवला. त्यातील एकाने लहान नातवाला बॅट फेकून मारली. नातूचा बचाव करण्यासाठी वृद्ध सुशिलाबाई व जगन्नाथ भोळे गेले असता त्यांच्या देखील डोक्यात चोरट्यांनी बॅट फेकून मारली. त्यात ते बेशुद्ध पडले.
दरम्यान चोरांनी सुशिलाबाई यांची सोन्याची पोत व कपाटातील रोख रकमेसह दागिने घेवून पलायन केले. याशिवाय गुरुदत्त नगर भागातील रहिवासी योगेश भानुदास पाटील यांच्या घरात देखील चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.