नाशिक : विवाहीत पुजाचा संसार चांगल्या प्रकारे सुरु होता. तिच्या संसार वेलीवर एका पुत्ररत्नाचे आगमन देखील झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु असतांना तिचे चंचल मन सैरभैर होण्यास वेळ लागला नाही. तारुण्याचा उन्माद असलेली पुजा कामानिमीत्त नेहमी रिक्षाने प्रवास करत होती. नाशिकच्या म्हसरुळ भागातील मोरे मळ्यात राहणारी विवाहीत पुजा आखाडे एका रिक्षाचालकाच्या प्रेमात पडली. सागर दिलीप भास्कर असे त्या रिक्षाचालकाचे नाव होते. रिक्षाचालक सागर भास्कर हा देखील मोरे मळा परिसरातच रहात होता.
सागर हा भाड्याची रिक्षा चालवत असे. कामानिमीत्त बाहेर येता जाता तिला सागरच्या ताब्यातील भाड्याच्या रिक्षात बसण्याचा योग एके दिवशी जुळून आला. नंतर हा योग नेहमी नेहमी जुळून आला. त्यामुळे विवाहीत पुजा आणि सागर यांच्यातील संभाषणाला चांगला वाव मिळत गेला. त्यातून दोघात जवळीक वाढत गेली. सागरच्या बोलबच्चनची मात्रा चंचल मनाच्या पुजावर अंमल करु लागली. बघता बघता तिला पतीपेक्षा परका सागर जवळचा वाटू लागला. पुजा आपल्या जाळ्यात फसत असल्याची जाणीव सागरला झाली. त्यामुळे त्याने तिच्यावर आपले प्रेमाचे जाळे फेकण्यास सुरुवात केली. भान हरपून पुजाने त्याच्यावर जिव लावण्यास सुरुवात केली. तिला त्याच्याबद्दल ओढ निर्माण झाली. दोघात जवळीक वाढल्याने आपोआपच दोघे एकमेकावर प्रेम करु लागले.
एके दिवशी नेहमीप्रमाणे ती त्याच्या रिक्षात बसली होती. तिला घरी सोडण्याएवजी तो तिला त्याच्या खोलीवर घेवून गेला. आपण विवाहीत असून चुकीच्या दिशेने मार्गक्रमण करत आहोत हे तिला समजत होते. मात्र तिच्यातील कामाग्नी तिला स्वस्थ बसू देत नव्हता. त्यामुळेच ती त्याच्यासोबत त्याच्या खोलीवर आली होती. एकांताचा लाभ घेत त्याने तिच्यापुढे प्रेमाचा प्रस्ताव ठेवला. त्याच्या बोलण्याला ती भुलली होती. आपण एक विवाहिता असून आपल्याला संसार असल्याचे ती विसरुनच गेली होती. बघता बघता दोन जिव एक होण्यास वेळ लागला नाही. सर्वस्व विसरुन ती त्याच्या बाहुपाशात विसावली होती. चुकीच्या मार्गाने तिचे पाऊल पडले होते. आता ती पुर्णपणे त्याच्या जाळ्यात फसली होती.
ती त्याला केवळ शरीरसुखच देत नव्हती तर अडीअडचणीत आर्थिक मदत देखील करत होती. अशा प्रकारे सागरने तिच्यावर एक तिर मारुन दोन निशाने साधले होते. आपल्याला तृप्त करणारा चांगला धष्टपुष्ट प्रियकर मिळाल्याच्या खुशीत पुजा होती. इकडे आपल्याला एक चांगली नवयौवना भोगण्यास मिळाल्याच्या खुशीत सागर होता. वेळप्रसंगी तो तिच्याकडून आर्थिक मदत घेवून आपले इप्सित साध्य करुन घेत होता.
मोह हे दुखा:चे कारण असते. एखाद्याला आपल्या जाळ्यात ओढण्यासाठी मोहाचे मायाजाल वापरले जाते. हेच मोहाचे मायाजाल सागरने पुजावर वापरण्यास सुरुवात केली होती. अमक्या योजनेत एवढे पैसे गुंतवले म्हणजे एवढे पैसे मिळतील असा बोलबच्चनचा फंडा त्याने तिच्या मनावर बिंबवण्यास सुरुवात केली. हळूहळू ती त्याच्या बोलबच्चनमधे गुंतू लागली. गुंतवणूक करण्याच्या बहाण्याखाली त्याने तिच्याकडून एके दिवशी तब्बल 80 हजार रुपये उधार घेतले. लवकरच यापेक्षा जास्त लाभ मिळवून तुला मोठी रक्कम मिळवून देतो अशा भुलथापा त्याने मारल्या. तिने देखील त्याला 80 हजार रुपये उधार दिले.
दोघांचे अनैतीक संबंध जसे कुणाला माहित नव्हते तसेच दोघातील 80 हजार रुपयांच्या व्यवहार देखील कुणाला माहित नव्हता. सागर आपला प्रियकर असून तो आपल्याला फसवणार नाही याची तिला खात्री होती. त्यामुळेच ती त्याला शरीरसुखासह आर्थिक मदत देखील करत होती. मात्र हे पैसे बुडवण्याचा कुविचार सागरच्या मनात आला होता. आपण ही रक्कम पुजाला परत केली नाही तर ती कुणाकडे तक्रार देखील करणार नाही हे त्याने ओळखून घेतले होते. त्यामुळे केवळ भुलथापांच्या बळावर तो तिची फसगत करत होता.
तिच्याकडून पैसे घेतल्यानंतर काही दिवसांनी कोरोना या विषाणूने सर्व जगभरात कहर सुरु केला. कोरोनाचा प्रसार वाढत गेल्यामुळे लॉकडाऊन सुरु झाले. लॉकडाऊन काळात सर्वच व्यवहार थांबले. पर्यायाने सागरची रिक्षा एकाच जागेवर थांबली. लॉकडाऊनमुळे रिक्षाच बंद असल्यामुळे सागर पैसे देणार नाही हे पुजा समजून होती. त्यामुळे तिने जास्त तगादा लावला नाही. मात्र कालांतराने लॉकडाऊन शिथील होण्यास सुरुवात झाली. हळूहळू सर्व व्यवहार पुर्वपदावर येण्यास सुरुवात झाली.
सागरने आपली रिक्षा फिरवण्यास सुरुवात केली. बिघडलेली आर्थिक घडी आता नव्याने बसेल व आपले 80 हजार रुपये आपल्याला परत मिळतील अशी आशा पुजाला होती. ती त्याला आपले 80 हजार परत मागू लागली. तीची पैशांची मागणी सुरु झाली म्हणजे तो तिला आश्वासन देवून चालढकल करत होता. त्याच्यावर विश्वास ठेवण्याची आता तिची मर्यादा संपुष्टात आली होती. आता ती त्याला दररोज पैसे मागू लागली. त्यामुळे तो वैतागला. ती आता आपला पिच्छा सोडण्यास तयार नसल्याचे त्याने ओळखले. तिला या जगातून कायमचे संपवले म्हणजे आपला पिच्छा सुटेल असा विचार त्याने मनातल्या मनात सुरु केला. तिला कायमचे संपवण्याचा त्याने कट रचण्यास सुरुवात केली.
मंगळवार दि. 19 जानेवारी रोजी पूजाने नेहमीप्रमाणे सागरकडे पैशांचा तगादा लावण्यास सुरुवात केली. काहीही करुन आज मला पैसे हवेत असा तिने हट्ट सुरु केला. आज तिच्या बोलण्यात नेहमीपेक्षा जास्त प्रमाणात धार होती. तिच्या बोलण्यातील धार सागरच्या मनाला कापून गेली. आज काहीही करुन मला भेट आणि माझे पैसे मला परत कर असे तिने त्याला बजावले. आज ती सुख देण्यासाठी नव्हे तर पैसे परत घेण्यासाठी बोलावत असल्याचे सागरच्या लक्षात आले होते.
आज तिला कायमची अद्दल घडवायची हे सागरने मनाशी ठरवले. कुविचारातून त्याने तिला रात्री भेटायला बोलावले. तत्पुर्वी त्याने एका धारदार चाकूची व्यवस्था करुन ठेवली. तो चाकू सोबत घेत त्याने रिक्षाला किक मारली. त्याने थेट तिचे घर गाठले व तिच्या घराजवळच रिक्षा उभी केली. ती तिच्या चार वर्षाच्या मुलासह घरात हजर होती. चल आज तुला पैसे देतो असे म्हणत त्याने तिला रिक्षात बसण्यास सांगीतले.
तिने मुलाला घरात सोडले व ती एकटीच त्याच्यासोबत रिक्षात बसली. तिला सोबत घेत त्याने मखमलाबाद रस्त्याच्या दिशेने रिक्षा हाकण्यास सुरुवात केली. पंचवटी भागातील म्हसरुळ शिवारात असलेल्या पवार मळ्याजवळ त्याने रिक्षा उभी केली. रिक्षा उभी राहताच तिने थेट पैशांच्या विषयाला हात घातला. त्यावर त्याने तिला म्हटले की आता माझ्याजवळ पैसे नाहीत. पैसे आल्यावर मी तुला देतो. त्याचे उत्तर ऐकून ती जाम चिडली. पैसे घेण्यास बोलावतो आणि देत नाहीस असे म्हणत तिने त्याची खरडपट्टी काढण्यास सुरुवात केली. पैशांच्या विषयावरुन दोघात रिक्षातच शाब्दिक बाचाबाची सुरु झाली. तिच्या बोलण्याचा ताबा सुटला होता. ती त्याला अर्वाच्च भाषेत शिव्यांची लाखोली वहात होती. तिचे बोलणे ऐकून त्याचा देखील रागाचा पारा चढला होता.
बघता बघता त्याने सोबत आणलेला धारदार चाकू बाहेर काढला. काही कळण्याच्या आत त्याने त्या चाकूचे घाव तिच्या गळ्यावर घालण्यास सुरुवात केली. गळ्यावर चाकूचे घाव बसताच तिने जिवाच्या आकांताने आक्रोश करण्यास सुरुवात केली. तिच्या हातापायांची थरथर आणी आवाजाची घरघर थांबल्यानंतर त्याने तिचा मृतदेह रिक्षातून बाहेर काढून नाल्याजवळ टाकून देत पलायन केले. त्यावेळी रात्रीचे साडेनऊ वाजले होते.
एका अनोळखी महिलेचा मृतदेह पवार मळ्यानजीक नाल्याजवळ रक्तबंबाळ अवस्थेत पडून असल्याची खबर म्हसरुळ पोलिस स्टेशनला कुणीतरी कळवली. माहिती मिळताच म्हसरुळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह उत्तरीय तपासणीकामी सरकारी रुग्णालयात पाठवण्यात आला.मृतदेहाची ओळख पटवण्याकामी तपासकाम सुरु करण्यात आले. शहरातील कोणत्या पोलिस स्टेशनला महिलेची मिसींग दाखल झाली आहे काय? याची तपासणी करण्यात आली. घटनेच्या रात्री मोरे मळ्यातील रहिवासी विनोद आखाडे याने त्याची पत्नी पुजा आखाडे बेपत्ता असल्याची तक्रार पंचवटी पोलिस स्टेशनला दिली असल्याची माहिती पोलिस पथकाला समजली.
पुजा आखाडे ही महिला पोलिसांच्या दृष्टीने अनोळखी होती. घटनास्थळावर मिळालेल्या महिलेचे वर्णन पंचवटी पोलिस स्टेशनला दाखल मिसींगमधील महिलेच्या वर्णनासोबत मिळतेजुळते होते. त्यामुळे पोलिसांनी मिसींग दाखल करणा-या विनोद आखाडे याचेशी संपर्क साधला. मृतदेह बघताच त्याने ही आपली पत्नी पुजा आखाडे असल्याचे पोलिसांना सांगीतले. घटनेच्या दिवशी रिक्षाचालक सागरसोबत पुजा गेली असल्याचे तिच्या चार वर्षाच्या मुलाने विनोद आखाडे यास सांगीतले होते. विनोद आखाडे याने तिच बाब पोलिस तपासात कथन केली होती. तसेच घटनास्थळापासून जवळच सुरु असलेल्या बांधकामावरील वॉचमनने देखील रिक्षाचालक व महिला यांच्यातील जोरजोरात सुरु असलेल्या भांडणाचा उल्लेख पोलिसांजवळ केला. मयत पुजाचे रिक्षाचालक सागर सोबत अनैतीक संबंध असल्याची बाब पोलिस तपासात उघड झाली होती. तपासकामी एक एक कडी जुळत गेली.
पोलिस पथकाने रिक्षाचालक सागरचे घर गाठले असता तो घरी नव्हता. ज्या मालकाची तो रिक्षा भाड्याने चालवत होता त्याच्याकडून सागरची माहिती घेण्यात आली. तरीदेखील फरार सागरचा कुठेही थांगपत्ता लागत नव्हता. त्याचे मोबाईल लोकेशन तपासले असता ते गुजरात राज्यात असल्याचे दिसून येत होते. त्याचा माग काढत पोलिस पथक गुजरात राज्यात गेले असता तो पुन्हा नाशीकला आल्याचे पोलिसांना समजले. तो नाशिकला आल्याचे समजताच त्याच्यावर झडप घालून त्याला ताब्यात घेत अटक करण्यात आली.
वैद्यकीय तपासणीत पुजा गर्भवती असल्याचे आढळून आले होते. पैशांच्या तगाद्याला कंटाळून आपण पुजाचा खून केल्याचे अटकेतील सागर भास्कर याने कबुल केले. त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने सुरुवातीला त्याला पोलिस कोठडी सुनावली. या गुन्ह्याचा तपास म्हसरुळ पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक पंढरीनाथ ढोकणे, सहायक पोलिस निरिक्षक सदाशिव भडीकर, शिवाजी अहिरे, सुधीर पाटील, पोलिस उप निरिक्षक मयुर पवार आदी करत आहेत.