जळगाव : लग्नात नाचण्यावरुन झालेल्या वादात तरुणावर चॉपरने वार करणा-या तरुणासह त्याला मदत करणा-या साथीदाराला एमआयडीसी पोलिसांनी अटक केली आहे. मध्यरात्री अडीच वाजता झालेल्या हल्ल्यात जखमी तरुणावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघे तरुण अटकेत आहेत.
जळगाव एमआयडीसी – तांबापुरा परिसरातील शाहरुख सलीम खाटीक व त्याचा मित्र अब्दुल मजीत मुक्तार हे दोघे जण प्रविण वाघ या मित्राच्या लग्नात शनिवारी गेले होते. त्यावेळी नाचण्यावरुन शाहरुख व अब्दुल या दोघांचा अमीन पटवा याचेशी वाद झाला होता. त्या दिवशी वाद कसाबसा मिटला होता. मात्र या वादाचे पर्यावसन आज 15 फेब्रुवारीच्या मध्यरात्री अडीच वाजता प्राणघातक हल्ल्यात झाले. मध्यरात्री अमीन उर्फ बुलेट पटवा याने अब्दुल मजीत बागवान याचा मोबाईल घेण्यासाठी शाहरुख यास घरातून बाहेर बोलावले. शाहरुख घरातून बाहेर येताच सरजील हारुण पटवा याने शाहरुख यास पकडून ठेवले. अमिन उर्फ बुलेट याने काटेरी दाते असलेल्या चॉपरने शाहरुख याच्या पोटावर डोक्यावर व हातावर वार केले. या हल्ल्यात शाहरुख जखमी झाला.
जखमी शाहरुख यास सुरुवातीला सामान्य रुग्णालयात व नंतर खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस स्टेशनला प्राणघातक हल्ला केल्याप्रकरणी सरजील पटवा व अमीन उर्फ बुलेट पटवा या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली आहे. पोलिस कर्मचारी सुधीर साळवे सचीन पाटील, चेतन सोनवणे, मुकेश पाटील व जमील शेख आदींनी त्यांना ताब्यात घेत अटक केली. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उप निरिक्षक गणेश कोळी करत असून दोघा हल्लेखोरांना उद्या न्यायालयात हजर केले जाणार आहे.