अहमदनगर : महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात येवून लग्नसमारंभातील रोख रक्कम व दागिने चोरणा-या टोळीचा पर्दाफास अहमदनगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने लावला आहे. आरोपींना मध्यप्रदेशातून जेरबंद करण्यात आले असून त्यांच्याकडून विविध गुन्ह्यांचा तपास लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
1 डिसेंबर 2020 रोजी मुंबई येथील रहिवासी नवनीत मिश्रा हे त्यांच्या मुलाच्या लग्नासाठी शिर्डी येथील साई निम ट्री हॉटेल येथे कुटूंबासह मुक्कामी आले होते. लग्नात खर्चासाठी त्यांनी दिड लाख रुपये बॅगेत सोबत आणले होते. लग्न समारंभात रात्रीआठ वाजता फोटोसेशनसाठी ते स्टेजवर गेले होते. दरम्यानच्या कालावधीत रोख रक्कम असलेली बॅग त्यांनी जवळच खुर्चीवर ठेवली होती. फोटो सेशन आटोपल्यानंतर त्यांना खुर्चीवर बॅग आढळून आली नव्हती. या बॅगेच्या चोरीबाबत शिर्डी पोलिस स्टेशनला गु.र.न. 760/20 भा.द.वि. 379 नुसार अनिल कुमार उपाध्याय, शिर्डी यांनी फिर्याद दाखल केली होती.
यानंतर देखील शिर्डी शहर व जिल्ह्यात अशा घटनांचा क्रम सुरुच होता. या गुन्ह्यांचा समांतर तपास शिर्डी स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. अनिल कटके व त्यांच्या पथकाकडून सुरु होता. पो.नि. अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथकातील स.पो.नि. मिथून घुगे, गणेश इंगळे, सहायक फौजदार सोन्या बापू नानेकर, पो.हे.कॉ. दत्तात्रय हिंगडे, संदीप घोडके, पो.ना. संदीप पवार, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, विशाल दळवी, रवि सोनटक्के, दिपक शिंदे, पो.कॉ. संदीप दरंदले यांनी तपासकामात झोकून देत आरोपींचा माग काढत मध्य प्रदेश गाठले.
तांत्रीक माहितीसह खब-यांच्या सहकार्याने मध्यप्रदेशातील आरोपी गोलू सुमेर मोजा उर्फ सिसोदीया (25)मुळ रा. बडा पिपलीया, जि. देवास, मध्यप्रदेश, हल्ली राहणार बजारपूर, जयपूर, शानमंदीर, गल्ली नं. 4, मकान नं. 380, न्यु दिल्ली, संदीप सुमेर झोजा उर्फ सिसोदीया (19) मुळ रा. बडा पिपलीया, जि. देवास, मध्यप्रदेश हल्ली राहणार बजारपूर, जयपूर, ज्ञानमंदीर, गल्ली नं. 4, मकान नं. 380, न्यु दिल्ली, यांना पिपलीयों, मध्यप्रदेश यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
अधिक चौकशीअंती त्यांचे साथीदार राधेशाम उदयराम राजपूत(30) रा. अलीविहार, ए-310, सरिता विहार, दिल्ली, विपीन राजपाल सिंग (21) व 1/2 पत कॉलनी, मिठापूर एक्स्टेंशन, घर नं. 289, गल्ली नं.4, नवी दिल्ली, गिरीराज दिनेशचंद शुक्ला (55), रा. ए-978/11 जैथपूर, पार्ट-2, बदरपूर, नवी दिल्ली, अनिल कमल सिसोदीया (30) हल्ली राहणार जैथपूर, बदरपूर, ज्ञानमंदीर, गल्ली नं. 4, मकान नं. 380, नवी दिल्ली, मुळ राहणार बडा पिपलीय, जि- देवास, मध्यप्रदेश, विशालकूमार बनी सिंग (19) रा. 98 ए, रोशननगर, अगवानपूर, हरियाणा यांना देवास, मध्यप्रदेश यांना विविध ठिकाणाहून ताब्यात घेण्यात आले.
आरोपींकडून गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या रोख रकमेपैकी 55 हजार रोख व गुन्ह्यात वापरलेली 13 लाख रुपये किमतीची हुंडाई व्हेन्यु कार (एमपी-09-सीसीएस-7450 व 9 लाख रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची पांढ-या रंगाची बलेनो कार (एमपी-09-डब्ल्युजी-5813) तसेच 78 हजार रुपये किमतीचे वेगवेगळ्या कंपन्यांचे सहा मोबाईल फोन असा एकूण 23 लाख 33 हजार रुपये किमतीच्या मुद्देमालासह रोख रक्कम हस्तगत करण्यात आली. त्यांना अटक केल्यानंतर शिर्डी पोलिस स्टेशनला हजर करण्यत आले.
अटकेतील आरोपींनी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अशा स्वरुपाचे गुन्हे केले असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यानुसार पुढील चौकशी व तपास सुरु आहे. अहमदनगर जिल्हा पोलिस अधिक्षक मनोज पाटील, अप्पर पोलिस अधिक्षीका (श्रीरामपूर) दिपाली काळे, उप विभागीय पोलिस अधिकारी शिर्डी संजय सातव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि.अनिल कटके व त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेत तपास यशस्वी केला.