जालना : दिवसा घरफोडी करणा-या टोळीच्या म्होरक्यास जालना स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुभाष भुजंग व त्यांच्या पथकाने जेरबंद केले आहे. 2 फेब्रुवारी रोजी जालना येथील गोविंद रामप्रसाद पांडे यांच्या गोपीकिशन नगर भागातील घरातून घरफोडी झाली होती. या घरफोडीत सोने चांदीचे दागीने चोरीला गेले होते. याप्रकरणी सदर बाजार पोलिस स्टेशनला अज्ञात आरोपींविरुद्ध भाग 5 गु.र.न. 90/2021 भा.द.वि. 454, 380 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासात वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पो.नि. सुभाष भुजंग व त्यांचे पथक कार्यरत झाले होते. इंदोर – मध्य प्रदेशातील पवन उर्फ भुरा रामदास आर्या याने त्याच्या टोळीच्या मदतीने दिवसा घरफोडीचा गुन्हा केल्याची माहिती पो.नि.सुभाष भुजंग यांना मिळाली. आरोपींचा शोध घेण्याकामी दोन पथके तयार करण्यात आली होती.
इंदोर, गोवा, कर्नाटक या राज्यांमध्ये तपास पथक आरोपींचा माग घेत असतांना पवन उर्फ भुरा रामदास आर्या या इंदोर येथील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळण्यात पथकाला यश आले. त्याने त्याच्या दोघा साथीदारांसह जालना जिल्ह्यात दिवसा तिन घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले. अटकेतील आरोपी पवन आर्या याने जळगाव, बुलढाणा, जालना, बीड, सांगली, कोल्हापुर, धारवाड कर्नाटक अशा ठिकाणी देखील दिवसा घरफोडीचे गुन्हे केल्याचे कबुल केले आहे.
महाराष्ट्रातील एकुण 12 व कर्नाटक राज्यातील एक असे एकुण 13 गुन्हे अटकेतील आरोपी पवन आर्या याने कबुल केले आहेत. यात जळगाव जिल्हा पेठ व एमआयडीसी पोलिस स्टेशनला दाखल असलेले प्रत्येकी एक असे दोन गुन्हे तर अहमदनगरचा एक, बुलढाणा येथील 2, जालना येथील 3, बीड येथील 2, सांगली व कोल्हापूर येथील प्रत्येकी एक तर कर्नाटक राज्यातील एक असे एकुण 13 गुन्ह्यांची जंत्री अटकेतील आरोपी आर्या याने पोलिसांना दिली आहे.
आरोपीकडून गुन्हयात वापरलेली चोरीची एक लाल रंगाची शेरवाले बीट कार, व मारुती सुझुकी कंपनीची बलेनो कार , सोने चांदीचे दागिने, व रोख रक्कम असा एकुण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अटकेतील गुन्हेगार सराईत असून त्याच्यावर राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र या राज्यात गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून बरेच गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
पोलिस अधिक्षक विनायक देशमुख, अप्पर पोलीस अधिक्षक विक्रांत देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, पोलीस उपनिरीक्षक दुर्गेश राजपुत, पो.हे.कॉ सॅम्युल कांबळे, पो.हे.कॉ किशोर एडके, पो.ना गोकुळसिंग कायटे, विनोद गडदे, कृष्णा तंगे, सागर बाविस्कर, लक्ष्मीकांत आडेप, सचिन चौधरी, संदीप मांटे, देविदास भोजणे, विलास चेके, महिला पोलीस मंदा बनसोडे, शमशाद पठाण यांनी तपासात सहभाग घेतला.