अहमदनगर : गाय छाप ब्रॅंड असलेल्या तंबाखू विश्वात मालपाणी उद्योग समुहाने आपले साम्राज्य उभे केले आहे. 70 वर्षाची परंपरा असलेल्या या उद्योग समुहाने 243 कोटी रुपयांची बेहिशेबी तंबाखूची विक्री केल्याचे आयकर तपासणीत उघड झाले आहे. 17 डिसेंबर रोजी मालपाणी उद्योगसमुहाच्या विविध 34 ठिकाणी आयकर विभागाने छापेमारी केली होती. आयकर विभागाच्या औरंगाबाद येथील पथकाने केलेल्या कारवाईत हस्तलिखीत व एक्सेल शीटच्या तपासात ही बाब उघड झाली आहे.
या उद्योग समुहाच्या बांधकाम क्षेत्रात देखील सुमारे 40 कोटी रुपयांची अनियमीतता प्राथमिक स्वरुपातील माहिती आयकर विभागाला आढळून आली असली तरी त्याबाबत निश्चीत व ठोस माहिती पुढे आलेली नाही. मालपाणी उद्योग समूहाने कोरोना संकटकालावधीत पन्नास लाख रुपयांचा निधी मुख्यमंत्री सहायता निधीला दिला आहे. स्थानिक ग्रामीण रुग्णालयासह विविध संस्थांना मालपाणी उद्योग समुहाने कोरोना संकट काळात 25 लाख रुपयांची मदत देखील केली आहे. श्रीराम मंदीर निर्मीतीसाठी सुमारे 1 कोटी रुपयांचा निधी या उद्योगसमुहाने दिला आहे.