लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पत्रकारितेचे महत्व अनन्यसाधारण – जयसिंग वाघ

जळगाव : राज्यघटनेनुसार कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्यायमंडळ कार्यरत आहे. या मंडळांच्या कामकाजामध्ये काही अपप्रवृत्ती निर्माण होत असेल तर त्याविरुद्ध आवाज उठवण्याची जबाबदारी पत्रकारितेची आहे. त्यामुळे त्यामुळेच लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी पत्रकारितेचे महत्व आजही अनन्यसाधारण असल्याचे प्रतिपादन साहित्यिक व चळवळीतील विचारवंत जयसिंग वाघ यांनी भुसावळ येथे केले.

भुसावळ येथील महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती वर्कर्स फेडरेशन व राष्ट्रवादी ट्रेड युनियन काँग्रेस यांच्या वतीने आयोजित सत्कार व परिसंवाद कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून जयसिंग वाघ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बहिष्कृत मजदूरचे संपादक अरुण दामोदर तर प्रमुख पाहुणे व वक्ते म्हणून ज्येष्ठ पत्रकार दिलीप तिवारी व अंनिसचे जिल्हा कार्याध्यक्ष दिगंबर कट्यारे उपस्थित होते. व्यासपीठावर सरकारी वकील अ‍ॅड. नितीन खरे, वरिष्ठ पत्रकार संजयसिंग चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत चौधरी, सलाउद्दीन अदिब, कामगार नेते जे. एस. वराडे, आदी उपस्थित होते. पत्रकारिता काल आणि आज या विषयावर बोलतांना जयसिंग वाघ यांनी गेल्या शेकडो वर्षांचा इतिहास कथन करून पत्रकारितेची वाट आणि त्यात दिवसेंदिवस झालेले परिवर्तन याविषयी सविस्तर माहिती दिली. पूर्वी सत्ताधा-यांची मर्जी सांभाळण्याचे काम पत्रकारिता करत असे. मध्यंतरीच्या काळात स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वपूर्ण भूमिका पत्रकारांनी बजावली आणि स्वातंत्र्यानंतर विकसित व शुद्ध पत्रकारिता पाहायला मिळू लागली. प्रिंट मीडिया सोबतच इलेक्ट्रोनिक मीडिया सुद्धा तसेच सध्या सोशल मीडिया वाचकांपर्यंत कमी वेळात पोहोचत असला तरी आजच्या युगात प्रिंट मीडियाचे महत्त्व किंबहूना विश्वासार्हता अजूनही टिकून आहे. हाच विश्वास अखंडितपणे टिकवून ठेवण्याची जबाबदारी आजच्या पत्रकारांची आहे.

आजच्या जाहिरातीच्या तसेच व्यवसायिक युगात पत्रकाराची लेखणी ही अन्यायाला वाचा फोडणे बरोबरच समाजाचे दर्पण होण्यासाठी झटली पाहिजे, असेही वाघ यावेळी म्हणाले. एखादा मुद्दा लावून धरणे योग्य आहे, परंतु त्याची अतिशयोक्ती होऊ नये अशी अपेक्षाही त्यांनी पत्रकारितेकडून व्यक्त केली. काल आणि आजची पत्रकारिता सांगता-सांगता उद्याची पत्रकारिता सुद्धा त्यांनी कथन केली.

कारणांचा शोध घेणारी पत्रकारिता आजच्या काळात गरजेची – दिलीप तिवारी
पत्रकार म्हणजे ज्याच्याकडे सांगण्यासारखे काही आहे, तो पत्रकार होय. तसेच घडलेल्या घटनांची कारणीमिमांसा करणे म्हणजे खरी पत्रकारिता. आजच्या काळात कारणांचा शोध घेणारी पत्रकारिता गरजेची आहे. आजच्या काळात माध्यमे जसजसी वाढत आहेत. तसे आपल्यापर्यंत बातम्या पोहोचण्याचे साधन वाढले आहे. आज एखादा विचार मांडला तर पाचव्या सेंकदाला तो माध्यमांपर्यंत पोहोचतो व सहाव्या सेंकदाला त्यावर विचारमंथन सुरु होते. सोशल मिडीयामुळे आजच्या काळात प्रत्येक माणूस हा पत्रकार झाला आहे. त्यामुळे माध्यमांचा वापर हा स्वतःच्या आवडीनिवडीने कसा करता येईल हे पाहिले पाहिजे. तंत्रज्ञानात अतिशय बदल झाला आहे. मात्र त्याचा वापर कसा होतो हे पाहणे गरजेचे आहे. माध्यमे आहेत परंंतु त्याचा नीट वापर करु शकत नाही. या कारणांमुळे माध्यमांची मक्तेदारी संपुष्टात येत आहे. याच कारणांमुळे आजची पत्रकारिता धोक्यात आल्याचे चित्र दिसत आहे. सोशल मिडीयामुळे बातमी निर्माण करण्याचा वेळ कमी झाला आहे. बातमी घडते त्याचवेळेस प्रसारणाचे तंत्र आले असल्याचे ते म्हणाले.

शहर पत्रकार संस्था अध्यक्ष प्रेम परदेशी यांचा जाहीर सत्कार
भुसावळ शहर पत्रकार संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सत्कारमूर्ती म्हणून प्रेम परदेशी यांचा जाहीर सत्कार करुन मान्यवर व आयोजकांच्या हस्ते सन्मानपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रम यशस्वितेसाठी अनिस तालुकाध्यक्ष श्यामकुमार वासनिक, अनिस अध्यक्ष शांताराम जाधव, ईश्वर खंडारे, अंनिस शाखा उपाध्यक्ष भगवान निरभवणे, वर्कर्स फेडरेशन झोन सचिव भरत पाटील, अध्यक्ष तेजराव नाईक, अनिस महिला प्रतिनिधी अंजना निरभवणे, अंनिस कार्याध्यक्ष सागर बहिरुणे, राजेश तायडे, राष्ट्रवादी ट्रेड युनियन अध्यक्ष कैलास झोपे, नरेश वाघ, सुमंगल अहिरे, अशोक शिंदे, सुरेश गणवीर, शशिकांत रायमुळे, राहुल कुचेकर, संतोष गौंड, सिध्दार्थ सोनवणे आदींनी परिश्रम घेतले. सुत्रसंचालन शामकुमार वासनिक, शांताराम जाधव यांनी तर आभार अंनिस कार्याध्यक्ष सागर बहिरुणे यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here