भिवंडी : दिवसभर जिम ट्रेनरचे काम केल्यानंतर रात्री घरफोडीचे काम करणा-या नऊ जणांना भिवंडी शहरातील शांतीनगर पोलिसांच्या पथकाने अटक केली आहे. या नऊ जणांच्या टोळीत एक अल्पवयीन बालक व महिलेचा देखील समावेश आहे.
14 फेब्रुवारी रोजी शांतीनगर – भिवंडी पोलिस स्टेशन हद्दीत एका मेसचालकास गावठी कट्ट्याच्या धाकावर चाकूचे वार करत त्याच्या ताब्यातील तिन मोबाईल हिसकावून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी, नितीन पाटील, डीबी पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कसीलास टोकले,पोलिस उपनिरीक्षक निलेश जाधव, रवींद्र पाटील, पो.कॉ. शेळके, चौधरी, इथापे, वेताळ, काकड, वडे, मोहिते, इंगळे, पाटील यांच्या पथकाने शोध घेत सहा आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून शांतीनगर येथील दोन व निजमपुरा येथील एक अशा एकुण तीन गुन्ह्यांचा उलगडा झाला.
अटकेतील तीन आरोपी जिम ट्रेनर आहेत. ते दिवसा तरुणांना जिम ट्रेनींग़ देण्याचे व रात्री घरफोड्या करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. इतर पाच घरफोडीच्या गुन्ह्यात तिघांना ताब्यात घेतले असता त्यात एक विधिसंघर्षग्रस्त बालक व एका महिलेचा समावेश आहे. एकुण नऊ आरोपींना शांतीनगर पोलिसांनी अटक केली आहे. अटकेतील आरोपींकडून गावठी कट्टा, चाकु, 9 हजार रुपयांचे दोन मोबाईल, दोन हजार रुपये रोख व गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे. यासोबत विविध पाच घरफोडीच्या गुन्ह्यांचा उलगडा देखील झाला आहे. यात 1 लाख 20 हजार रुपयांचे सहा तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम , 15 हजार रुपयांचे मोबाईल असा 2 लाख 41 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.