जळगाव : 20 डिसेंबरचा तो दिवस होता. या दिवशी प्रियाच्या घरात आनंदी आनंद होता. घरात सर्वांच्या आनंदाला उधान आले होते. या दिवशी प्रियाचे लग्न ठरले होते. औरंगाबाद येथील पियुष हरीदास बावस्कर या उपवर तरुणासोबत तिचे लग्न निश्चीत करण्यात आले होते. नातेवाईकांनी म्हटल्याप्रमाणे पियुष हा औरंगाबाद येथील श्री साई पॉलीटेक्निक कॉलेज ऑफ इंजिनियरिंग येथे सहायक प्राध्यापक म्हणून सेवेत होता. नातेवाईकांनी सांगीतल्याप्रमाणे पियुष यास सहा लाख रुपयांचे पॅकेज होते. महत्वाचे म्हणजे जवळच्या नातेवाईकांनी प्रियाचा भावी पती पियुष हा निर्व्यसनी असल्याचे प्रियासह तिच्या आईवडीलांना सांगण्यात आले होते. उपवर पियुषबद्दल भरभरुन कौतुक केल्यामुळे प्रिया भारावुन गेली होती. उपवर पियुष गोरागोमटा होता. हसतांना त्याच्या गालावर खळी पडत असे. त्याचे राहणीमान बघून तो खरोखरच प्राध्यापक असेल असे सर्वांनाच वाटले होते.
लग्नाचा मुहुर्त लवकरच काढण्याचे निश्चीत करण्यात आले. 9 जानेवारी रोजी जळगाव येथील लेवा भवन येथे प्रिया आणि पियुष यांचा विवाह मोठ्या थाटामाटात मात्र कोरोनाचे सर्व नियम पाळून करण्यात आला. डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात कोरोनाचा सर्वत्र कहर सुरु होता. लग्न ठरल्यानंतर लांबणीवर टाकण्यापेक्षा कमीतकमी आमंत्रितांमधे विवाह सोहळा उरकण्याचे प्रियाच्या वडीलांनी ठरवले होते. एकप्रकारे त्यांचा निर्णय देखील योग्य असल्याचे इतर नातेवाईकांनी बोलून दाखवला.
लाडात वाढलेल्या प्रियाचा विवाह मोठ्या थाटामाटात आणि धुमधडक्यात करण्याचे नियोजन तिच्या वडीलांनी मनाशी केले होते. प्रियाचे वडील शिपाई पदावर असले तरी लाडक्या लेकीला त्यांनी चांगले शिकवले होते. तिला चांगले स्थळ मिळावे आणि ती आयुष्यभर सुखात रहावी यासाठी त्यांची धडपड सुरु होती. आठवड्याचे शनिवार आणि रविवार ते कायम लेकीच्या वरसंशोधनासाठी राखीव ठेवत होते. आपल्या पित्याची आपल्यासाठी उत्तम स्थळ शोधण्याची धडपड बघून प्रियाचा उर भरुन येत असे. आपल्या जवळच्या आणि निवडक नातेवाईकांच्या माध्यमातून ते प्रियासाठी स्थळ शोधण्यासाठी कधीही आणि कुठेही प्रवास करण्यास मागे पुढे बघत नव्हते.
दरम्यान त्यांना औरंगाबाद येथील पियुष हरीदास बावस्कर या उपवर तरुणाच्या स्थळाचा शोध लागला. हरीदास बावस्कर यांचा पुत्र पियुष हा औरंगाबाद येथील एका इंजीनिअरींग कॉलेजमधे सहायक प्राध्यापकपदी नोकरीला असल्याचे त्यांना नातेवाईकांमार्फत सांगण्यात आले. तरीदेखील खात्री करण्यासाठी प्रियाचे वडील पियुष नोकरी करत असलेल्या कॉलेजमधे गेले. त्यांनी कॉलेजच्या प्राचार्यांची भेट घेवून पियुषबद्दल विचारपुस केली. पियुष बावस्कर हा आमच्या कॉलेजमधे कायमस्वरुपी सेवेत असल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. त्यामुळे प्रियाच्या वडीलांची खात्री पटली होती. निश्चींत मनाने त्यांनी औरंगाबाद येथून जळगावच्या दिशेने आपल्या गावी परतीचा प्रवास सुरु केला. आता आपली लेक सुखात राहील एवढी एकच आशा मनाशी बाळगून त्यांनी लग्नाची पुढील तयारी सुरु केली होती.
9 जानेवारी रोजी लग्नसोहळा झाल्यानंतर प्रिया सासरी औरंगाबाद येथे जाण्यास निघाली. जातांना तिला आपले माहेर सोडून जाण्याचे दुख: अनावर झाले. ती आईवडील व भावाच्या गळ्यात पडून ओक्साबोक्सी रडू लागली. मात्र प्रत्येक मुलीला एक दिवस आपल्या सासरी जावेच लागते अशी समजूत काढून तिची सासरी रवानगी करण्यात आली. औरंगाबाद येथील सासरी माप ओलांडून तिने गृहप्रवेश केला. लग्न झाल्यानंतर जवळपास पहिले मुल होईपर्यंत नवविवाहीत तरुणींसाठी सुखाचा काळ समजला जातो. या काळात नवविवाहीत तरुणीची नवलाई केली जाते. सर्वच जण तिचे कौतुक करतात. सासरकडील मंडळी चांगली असेल तर तिला सासर आणी माहेर यात फरक देखील जाणवत नाही.
मात्र दोनच दिवसात नवविवाहीत प्रियाला आपल्या पतीसह सासरकडील मंडळींचा संशय येवू लागला. त्यांचे वागणे बोलणे तिला विचीत्र वाटू लागले. लग्नानंतर दोनच दिवसांनी गालावर खळी असणारा पियुष दारु पिऊन घरी आला. सरस्वतीचा पुजक असल्याचे सांगण्यात आलेला पियुष दारु पिऊन दोलायमान स्थितीत घरी आल्याचे बघून नवविवाहीत प्रियाला राहवले गेले नाही. ती त्याच्यावर जाम भडकली. लग्नापुर्वी तिला सांगण्यात आले होते की पियुष निर्व्यसनी आहे. महात्मा गांधीजींनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे तो मद्याचा निषेध करणारा सद्गुणी प्राध्यापक असल्याचे तिला सांगण्यात आले होते. मात्र इथे तर तिला उलटेच दिसून आले.
तिने पती पियुष यास खडसावून त्याच्या मद्यपानाबद्दल विचारणा केली. मद्याच्या नशेत असलेल्या पियुषने दोन दिवसापुर्वी आपल्या घरी पत्नी म्हणून आलेल्या प्रियावर खेकसण्यास सुरुवात केली. तो केवळ खेकसलाच नाही तर तिला अतिशय खालच्या पातळीवरील शिवीगाळ करु लागला. झोपडपट्टीतील मद्यपींची शिवीगाळ सिमेंट कॉक्रिटच्या घरात आली होती. त्याचे अतिशय खालच्या स्तरावरील बोलणे आणि शिवीगाळ करण्याचा प्रकार बघून प्रियाला कसेतरीच झाले. आपण पाहिलेले स्वप्न प्रत्यक्षात साकारणार की नाही याबद्दल तिच्यापुढे प्रश्नचिन्ह निर्माण झाला.
त्यादिवशी प्रिया आणि पियुष यांच्यातील वादाने ती रात्र खराब झाली होती. एक प्राध्यापक अशा प्रकारे दारु पिऊन घरी आल्यानंतर इतक्या खालच्या स्तरावरील शिवीगाळ कशी काय करु शकतो हा यक्षप्रश्न तिला पडला होता. त्यानंतर हा प्रकार रोजचाच झाला. पियुष दररोज दारु पिऊन घरी येऊ लागला. पियुषच्या वागण्यावर तिला संशय येऊ लागला. एके दिवशी तो दारुच्या नशेत असतांना तिने त्याचा मोबाईल तपासला. तो इतर महिलांशी नियमीतपणे चॅट करत असल्याचे तिला आढळून आले. याशिवाय इतर महिलांसोबत त्याने केलेल्या कॉलची रेकॉर्डींग देखील तिने ऐकली. त्याचा मोबाईल तपासल्यानंतर तिला धक्काच बसला. सासू व सास-यांकडे तिने आपली व्यथा कथन केली. मात्र तिला त्यांच्याकडून हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यांनी एकप्रकारे पियुषच्या वागण्याचे समर्थन केले. त्यामुळे ती निराश झाली. आपला पतीच आपल्या मनाप्रमाणे वागत नाही म्हणून तिने सासु सास-यांकडून मदतीची याचना केली होती. मात्र तिला त्यात देखील अपयश आले.
एके दिवशी तिला पती पियुषसमवेत कॉलेजच्या चेअरमनच्या घरी जेवण करण्यासाठी जाण्याचा योग आला. त्यावेळी संस्थेचे चेअरमन आणि पियुष यांच्यातील संभाषणातून तिला समजले की पियुष हा त्या संस्थेत कायमस्वरुपी सेवेत नसून त्याला सहा लाख रुपयांचे पॅकेज देखील नाही. ते संभाषण ऐकून तिच्या मनाला मोठ्या प्रमाणात वेदना झाल्या. आपल्याला पियुषबद्दल खोटे सांगण्यात आल्याचे तिच्या लक्षात आले होते. आपली व आपल्या आईवडीलांची फसवणूक झाल्याचे तिला समजले होते. काही दिवसांनी तिचे लक्ष त्याच्या मतदान कार्डावरील जन्म तारखेवर गेले. लग्नाच्या वेळी परिचय पत्रात दिलेली जन्म तारीख व मतदान कार्डावरील जन्म तारीख यांच्यात तफावत असल्याचे तिच्या लक्षात आले. याठिकाणी देखील आपली फसवणूक झाल्याचे तिच्या लक्षात आले. अशा प्रकारे वादाला तोंड फुटत होते.
प्रियाचे दुख: एवढ्यावरच थांबले नाही. दारुच्या नशेत तो तिच्यासोबत अतिशय क्रुर पद्धतीचे कृत्य करु लागला. तिचा हात पिरगाळून, बळाचा वापर करुन तो तिच्या नाजुक अंगावर चावा घेवू लागला. तिच्या नाजुक अंगावर बुक्के मारुन त्याला निचपणाचे सुख मिळत होते. पोर्न फिल्ममधे दाखवतात त्याप्रमाणे तो तिला मुखमैथुन करण्यास भाग पाडत होता. दारु पिऊन आल्यावर तिला अतिशय खालच्या स्तरावरील शिवीगाळ करणे नित्याचे झाले होते. एवढेच नव्हे तर तिला सिगारेट व दारु पिण्यास तो तिला भाग पाडत होता. प्रियाचे स्वप्न पुर्णपणे भंगले होते. आपली पार फसवणूक झाल्याचे ती पुर्णपणे समजून चुकली होती. आता काय करावे हा यक्षप्रश्न तिच्यापुढे होता.
पियुषने बॅंकेकडून तिन लाख रुपयांचे कर्ज घेतले असल्याचे काही दिवसांनी प्रियाला समजले. त्या कर्जाची परतफेड करण्यासाठी प्रियाने आपल्या आईवडीलांकडून तिन लाख रुपये आणावे यासाठी तिच्यावर पियुषकडून दडपण टाकले जाऊ लागले. शिपाई पदावर असलेल्या प्रियाच्या वडीलांनी तिचे लग्न पै पै जोडून कसेबसे केले होते. आता तिन लाख रुपयांची रक्कम त्यांच्या आवाक्याबाहेरची असल्याचे प्रिया जाणून होती. पती पियुषसह त्याचे आईवडील देखील प्रियाला तिन लाख रुपये माहेरुन आणण्यासाठी मारहाण व दडपण टाकू लागले. लग्नाला जेमतेम एक महिना देखील झाला नसतांना व नवविवाहित प्रियाचे नवलाईचे दिवस असतांना तिच्या नशीबी हा दुखा:चा डोंगर उभा राहिला होता. त्यामुळे तिने नाईलाजाने आपल्या माहेरी जाण्याचा पियुषकडे हट्ट धरला. तुझा जळगावला यार आहे म्हणून तु जळगावला जाण्याचा हट्ट धरते असे बोलुन त्याने तिच्या मनाला वेदना देण्यास सुरुवात केली.
आपल्या लेकीची पर्यायाने आपली देखील फसवणूक झाल्याचे तिच्या आईवडीलांना समजले. त्यांनी निवडक नातेवाईकांसह औरंगाबाद गाठले. प्रियाच्या आईवडीलांसह नातेवाईकांनी तिच्या सासरच्या मंडळींची समजूत काढली. कसेबसे समजावत त्यांनी प्रियाला 5 फेब्रुवारी रोजी माहेरी जळगाव येथे परत आणले. माहेरी आल्यावर देखील प्रियाच्या नशीबी असलेले दुख: संपलेच नाही. दुस-याच दिवशी 6 फेब्रुवारीपासून प्रियाच्या मोबाईल क्रमांकावर एका महिलेचा फोन सातत्याने येऊ लागला. पलीकडून बोलणारी महिला तिला सांगू लागली की तू पियुषसोबत लग्न केलेच कसे? तुला अगोदर व्यवस्थित माहिती घेता आली नाही काय? मी पियुषची तिसरी पत्नी आहे.
अखेर प्रियाने जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला धाव घेत पो.नि.विलास शेंडे यांची भेट आपली व्यथा कथन केली. पो.नि. विलास शेंडे यांनी प्रियाची दर्दभरी व्यथा ऐकून या प्रकरणी तिची फिर्याद दाखल करुन घेण्यास संबंधीत ठाणे अंमलदारास सुचना केली. प्रियाच्या फिर्यादीनुसार जळगाव जिल्हापेठ पोलिस स्टेशनला तिचा पती पियुष हरीदास बावस्कर व त्याला गुन्ह्यात समर्थन, मदत करणारे वासंती हरीदास बावस्कर(सासु),हरीदास खंडू बावस्कर (सासरा), शंकर खंडू बावस्कर (चुलत सासरे) या सर्व संशयीतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. या सर्वांविरुद्ध फसवणूकीच्या उद्देशाने संगनमताने कट केल्याप्रकरणी विविध घटकाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हा भाग 5 गु.र.न. 68/21 भा.द.वि. 377, 417, 420, 406, 294, 498 अ प्रमाणे दाखल करण्यात आला.
दरम्यान प्रियाच्या वडीलांनी तिच्या लग्नापुर्वी औरंगाबाद येथे जाऊन महाविद्यालयाच्या प्राचार्यांकडे जावून पियुष खरोखरच कायम स्वरुपी सेवेत आहे किंवा नाही याची विचारपुस केली होती. त्यावेळी प्राचार्यांकडून पियुष कायमस्वरुपी सेवेत असल्याचे सांगून त्याला सहा लाख रुपयांचे पॅकेज असल्याचे प्रियाच्या वडीलांना सांगण्यात आले होते. प्राचार्यांकडून खोटी माहिती दिली गेल्यामुळे प्रिया व तिच्या आईवडीलांची फसवणूक झाली. याप्रकरणी प्राचार्यांस देखील आरोपी करणार असल्याचे पोलिसांनी माहिती दिली आहे. वृत्त संकलन करत असतांना सर्व संशयीतांना अटक झालेली नव्हती. या गुन्ह्याचा पुढील तपास पो.नि. विलास शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. (या कथेतील पिडीत नवविवाहीतेचे “प्रिया” हे नाव काल्पनिक आहे.)