जळगाव : गांधी रिसर्च फाउण्डेशन, जळगांव आणि मराठी विज्ञान परिषद, मुंबई यांनी आयोजित केलेल्या राष्ट्रीय नवसंशोधन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारोह 28 फरवरी 2021 रोजी (राष्ट्रीय विज्ञान दिन) ऑनलाईन पद्धतीने संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ अनुशास्त्रज्ञ व गांधी रिसर्च फाउण्डेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर होते. नॅशनल इनोवेशनचे डॉ. विपिन कुमार, गुजरात विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. सुदर्शन आयंगार, ज्येष्ठ अनुशास्त्रज्ञ प्रा. जे. बी. जोशी, मराठी विज्ञान परिषदेचे मानद सचिव ए. पी. देशपांडे, गांधी रिसर्च फाउण्डेशच्या सौ. अंबिका जैन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या.
महात्मा गांधी यांच्या विचारांना अभिप्रेत ग्राम स्वराज्य निर्माण कऱण्यासाठी विज्ञानाच्या माध्यमातून ग्रामीण भागात विविध प्रयोग करुन उपयोगी शाश्वत व पर्यावरणपुरक तंत्रज्ञान निर्माण व्हावे म्हणून विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी व त्यांच्यातील कल्पना शक्तिला वाव देवून त्यांच्यातून भविष्यात चांगले संशोधक, शास्त्रज्ञ निर्माण करण्याच्या हेतूने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
संपूर्ण भारतातून इ. 5 वी ते 7 वी व इ. 8 वी ते 10 वी अशा दोन गटातून एकूण 1950 विद्यार्थ्यांनी स्पर्धेत सहभाग नोंदविला. अत्यंत नाविण्यपूर्ण प्रयोग या विद्यार्थाकडून सादर करण्यात आले. डॉ. अनिल काकोडकर यांच्या नेतृत्वाखाली परिक्षण समितीने या प्रयोगांचे परिक्षण करुन अंतिम विजेते घोषित केले. विजेते घोषित करतांना सोशल मिडियावर (Facebook & Youtube) मिळालेल्या लाईक्स चा ही काही प्रमाणात विचार करण्यात आला.
यावेळी बोलतांना डॉ. अनिल काकोडकर यांनी विज्ञान व महात्मा गांधीजींच्या परस्पर नाते विश्वास व विचारांबद्दल मार्गदर्शन केले. महात्मा गांधी हे सत्य शोधक होते. एका शास्त्रज्ञानाप्रमाणे प्रयोगशील होते. त्यांनी आपल्या आत्मकथेचे नावच माझे सत्याचे प्रयोग असे दिले होते. त्यांचा विज्ञानाला विरोध नव्हता. तर विज्ञानाच्या माध्यमातून होत असलेल्या शोषणाला होता. विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रयोगाचे त्यांनी कौतुक केले व त्यातून उद्याचे संशोधक निर्माण होतील असा विश्वास व्यक्त केला. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना प्रो. जे. बी. जोशी यांनी विद्यार्थ्यांना यशातून आपण जितके शिकतो त्यापेक्षा जास्त अपयशातून शिकतो हे नेहमी लक्षात ठेवण्याचे आवाहन केले. आज आपला देश अजूनही अनेक बाबींमध्ये स्वयंपूर्ण झाला नाही म्हणूनच आपण आपले संशोधन करणे गरजेचे असून विद्यार्थी दशेपासूनच हे संस्कार विद्यार्थ्यांवर होण्यासाठी अशा स्पर्धा उपयुक्त ठरतात.
आपल्या मनोगतात डॉ. विपीन कुमार यांनी बक्षिसपात्र विद्यार्थ्यांच्या प्रयोगांना पेटंट मिळवून देण्यासाठी मदत करणार असल्याचे घोषित केले. डॉ. सुदर्शन आयंगार यांनी आपल्या गरजा कमीत-कमी करुन त्या भागवण्यासाठी स्थानिक साधनांचा वापर करता येईल व त्यासाठी नवीन संशोधन विद्यार्थ्यांनी करुन गांधीजींना अभिप्रेत ग्रामस्वराज्य निर्माण करण्याचे आवाहन केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.
बक्षिसप्राप्त विद्यार्थ्यांचे नावे पुढीलप्रमाणे आहेत. पहिला गटातून – (इ. 5 वी ते 7 वी) प्रथम क्रमांक (रु. 31,000 शैक्षणिक साहित्य) – श्रीराम अमोल बोधे, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा (धूळ जमा करणारा सुधारित झाडू). द्वितीय क्रमांक (रू. 21,000 शैक्षणिक साहित्य) – ईश्वरी भीमराज रोहोकले, महात्मा फुले विद्यालय भालवानी, अहमदनगर (आधुनिक सौर वॉशिंग मशीन). तृतीय क्रमांक (रू. 15,000 शैक्षणिक साहित्य) – सुफियान जाकिरहुसेन शेख, श्री छत्रपती शिवाजी विद्यालय, अहमदनगर (नंबर पझल. उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – पीयूष निलेश गाढवे, अण्णासाहेब कल्याणी विद्यालय, सातारा. (व्हाइटबोर्डसाठी डस्ट फ्री डस्टर आणि क्विक फिंगर डस्टर). उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – 1) हेमाश्री जी टी., 2) पुनिता बी., 3) तेगराजन जी., तक्षिल्ला ग्लोबल स्कूल, तिरुपटुरे, तामिळनाडू (सांघीक) (मोबाईल दरवाजा सुरक्षा अलार्म चे सुधारित मॉडेल). उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – ओम विनोद अवारे पीडी. डॉ. विठ्ठलराव विखे पाटील विद्यालय, लोणी, अहमदनगर (स्मार्ट फ्रुट पिकर). उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – रुतिक रवींद्र इंगळे एस. बी हायस्कूल, तेल्हारा, अकोला (स्मार्ट आणि स्वच्छ बस)
दुसऱ्या गटातून – (इ. 8 वी ते 10 वी) प्रथम क्रमांक (रू. 31,000 शैक्षणिक साहित्य) – शिवानी रावसाहेब म्हस्के, श्री संतुकनाथ अंग्रेजी विद्यालय, जेऊर बा, अहमदनगर (विक्री कौशल्य) द्वितीय क्रमांक (रू. 21,000 शैक्षणिक साहित्य) – आदित्य अशोक अहिरे, श्री. जी आर औताडे पाटील विद्यालय, ता. कोपरगाव, अहमदनगर (आम आदमी सौर वॉटर हीटर) तृतीय क्रमांक (रू. 15,000 शैक्षणिक साहित्य) – तावरे हर्षल गोरख, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनियर कॉलेज बारामती, पुणे (ध्वनी वेव्हज डिटेक्टर)उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – जय दिनकर ढाके, विवेकानंद प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल, जळगाव. (स्वयंचलित तापमान फीडर) उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – ऐश्वर्या हीरो मोटवानी, एसपीपी न्यू एरा हायस्कूल, ठाणे (स्वच्छता कार्यरत मॉडेल)उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – निहार अमोल मुंज, सह्याद्री माध्यमिक विद्यालय, बडगांव, सिंधुदुर्ग (डायपरचा पुर्नवापर कसा करावा) उत्तेजनार्थ पुरस्कार (रू. 5,000 शैक्षणिक साहित्य) – साहिल कलमु मुजावर, श्री नानादिकेश्वर विद्यालय, उपलाई, सोलापूर (फ्रेश मशिन)