पुणे : मुंबई – बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार येथे खेड-शिवापूर व आणेवाडी हे दोन टोलनाके आहेत. या दोन्ही टोलनाक्यांवर बनावट पावत्यांच्या माध्यमातून गेल्या दोन महिन्यापासून अव्याहतपणे वाहनचालकांसह शासनाची फसवणूक सुरु होती. या दोन महिन्याच्या कालावधीत जवळपास साडेचार कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे.
पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी याप्रकरणी माहिती दिली आहे. लेखापरिक्षण अहवालानुसार 24 फेब्रुवारी रोजी सुमारे 2000 वाहने चोवीस तासाच्या कालावधीत 3 लाख 80 हजार रुपयांच्या बनावट पावतीच्या माध्यमातून टोल नाक्यावरुन गेली आहेत. बनावट पावत्यांच्या माध्यमातून वाहनचालकांची फसवणूक होत असल्याची तक्रार पुण्याच्या मंगळवार पेठेतील अभिजीत बाबर यांनी पोलिस खात्याकडे केली होती. त्यांच्या तक्रारीच्या आधारे पुणे ग्रामीण पोलिस पथकाने खात्री केली. खेड शिवापूर टोलनाक्यावरील शेवटच्या लेनमधील कर्मचारी 190 रुपये मुल्य असलेली बनावट पावती वाहनचालकास देत असल्याचे दिसून आले होते.
याप्रकरणी सुरेश प्रकाश गंगावणे (25), वाई, सातारा, अक्षय सणस (22), वाई, सातारा, शुभम सीताराम डोलारे (19), जनता वसाहत, पुणे, साई सुतार (25), कात्रज, पुणे या चौघांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून टोलवसुलीच्या बनावट पावत्या जमा करण्यात आल्या. त्यांचे साथीदार हेमंत भाटे, दादा दळवी, सतीश मरगजे, यांच्यासह अन्य साथीदारांवर देखील वाहनचालकांची फसवणूक केल्याप्रकरणी राजगड पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अधिक तपासात अजय चव्हाण (19), वाई, सातारा, संकेत गायकवाड (22), जावळी, सातारा, अमोल कोंडे (36), खेडशिवापूर, पुणे या आरोपींना अटक करण्यात आली. अमोल कोंडे या ठेकेदारासह विकास अण्णा शिंदे, वाई, सातारा, मनोज दळवी, भोर,पुणे, सतीश मरगजे, हेमंत बाठे या फरार ठेकेदारांचा पोलीसांकडून शोध सुरु आहे. बनावट पावत्यांच्या माध्यमातून टोल वसुलीची रक्क्म ठेकेदाराच्या कब्जात जात असल्याचे उघड झाले आहे. पुणे – सातारा टोल रोड प्रायव्हेट लिमीटेड या कंपनीची बनावट टोल पावती लॅपटॉपला प्रिंटर लावून पर्यायी सॉफ्टवेअरच्या माध्यमातून तयार केली जात असे. त्या रकमेचा नंतर झोल केला जात होता.