पुणे :अटकेतील आरोपीस पोलिस कोठडी मिळण्याकामी न्यायालयात हजर न राहणा-या पोलिस उप निरिक्षकास तातडीने निलंबनाच्या कारवाईला सामोरे जावे लागले आहे. सिंहगड रोड पोलिस स्टेशनमधील अविनाश शिंदे असे निलंबन झालेल्या पोलिस उप निरिक्षकाचे नाव आहे.
न्यायालयात हजर न राहता पर्यायी व्यवस्था म्हणून फौजदार शिंदे यांनी आरोपीसह सहायक फौजदाराला न्यायालयात रवाना केले होते. वरिष्ठांच्या सुचनेप्रमाणे अविनाश शिंदे स्वत: न्यायालयात हजर राहिले नाही. त्यामुळे आरोपीला पोलिस कोठडी एवजी न्यायालयीन कोठडी मिळाली. आपण न्यायालयात जात असल्याची माहिती शिंदे यांनी वरिष्ठांना व्हाटसअॅपवर कळवली होती. प्रत्यक्षात ते न्यायालयात गेले नाही. या कसुरीबद्दल वरिष्ठांनी पोलिस उप निरीक्षक अविनाश शिंदे यांना तातडीने निलंबीत केले आहे.
रोशन लोखंडे या गुंडासह त्याच्या साथीदारांनी सिंहगड रस्त्यावरील दुकानदारांना धमकावून दहशत पसरवली होती. या घटनेबद्दल माहिती असून देखील आरोपींना पकडण्याची अथवा वरिष्ठांना माहिती न दिल्याप्रकरणी दोघा पोलिस कर्मचा-यांना निलंबीत करण्यात आले आहे. याच गुन्ह्यातील आरोपींचा तपास पोलिस उप निरिक्षक अविनाश शिंदे यांच्यावर सोपवला होता. वरिष्ठांच्या आदेशानुसार विविध मुद्द्यांखाली आरोपींच्या पोलिस कोठडीच्या मागणीसाठी स्वत: पोलिस उप निरिक्षक अविनाश शिंदे यांची न्यायालयात हजेरी आवश्यक होती. ती जबाबदारी त्यांनी सहायक फौजदारावर टाकली होती. याशिवाय त्यांनी आपला मोबाईल देखील स्विच ऑफ केला असल्याची बाब वरिष्ठांनी नमुद केली.